अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेबद्दल नगरकरांमध्ये समाधान निर्माण व्हावे, यासाठी त्यांच्या दैनंदिन तक्रारींचे निराकरण तातडीने झाले पाहिजे. नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनावरील विश्वास कमी होतो. त्यामुळे प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे, अशा सूचना महापौर ज्योती गाडे यांनी दिल्या. महापौर गाडे आणि उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी अधिकार्यांसमवेत बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत महापौर गाडे यांनी अधिकारी वर्गाला नागरिकांशी निगडित कामे प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेमध्ये उपायुक्त, ऑडिटर, कॅफो आणि शहर अभियंता यांसारखी काही महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे कर्मचार्यांवर ताण येत आहे. ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. जन्म-मृत्यू दाखले डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, विद्युत विभागात ऊर्जा बचत उपाययोजना करून खर्च कमी करावा, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ वाढवावे, बांधकाम परवान्यांची प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीतून तातडीने पूर्ण करावी, बंद पडलेली उद्याने दुरूस्त करून पुन्हा नागरिकांसाठी खुली करावीत, पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
उपमहापौर अॅड. जाधव यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना सूचना दिल्या. ते म्हणाले, सर्व कर्मचारी यांनी शासकीय वेळेनुसार कामकाज सुरू करावे. दुपारच्या विश्रांतीनंतर तातडीने कार्यालयात हजर राहावे आणि निर्धारित वेळेपूर्वी सुट्टी घेऊ नये, वेळापत्रकाचे पालन न करणार्यांवर कारवाई केली जाईल, आपले कार्यालय आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी. आयुक्त यशवंत डांगे यांनी बैठकीत सविस्तर अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निधीतून शहरातील 24 रस्त्यांची कामे सुरू असून त्यापैकी 14 पूर्ण झाली आहेत.
आतापर्यंत शासनाने 44 कोटी रूपये अनुदान दिले असून मनपाने 15 कोटी रूपये स्वतःच्या निधीतून टाकले आहेत. नेहरू मार्केट प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली असून 70 ओटे व 60 दुकाने उभारली जाणार आहेत. सर्जेपुरा रंगभवनासोबत पार्किंग आणि सांस्कृतिक भवन, दोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जिजामाता हॉस्पिटलचे काम सुरू आहे. शहरात दररोज स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि मोकाट जनावरांवरील नियंत्रण मोहिमा राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.




