Sunday, September 27, 2026
Homeक्राईमCrime News : मोक्क्यासह सहा गुन्ह्यांतील पसार आरोपी दोन साथीदारांसह जेरबंद

Crime News : मोक्क्यासह सहा गुन्ह्यांतील पसार आरोपी दोन साथीदारांसह जेरबंद

चांदबिबी महालाजवळ एलसीबीची कारवाई || दोन गावठी कट्टे जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मोक्का कायद्यासह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पसार असलेल्या आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले. चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील सर्कल परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन आणि विनाक्रमांकाची दुचाकी असा एकूण दोन लाख 24 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक तयार केले होते. मंगळवारी (25 ऑगस्ट) पथक अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना पाथर्डी येथील लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार याच्याकडे गावठी कट्टा असून तो दोन साथीदारांसह चांदबिबी महालाजवळील अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील सर्कल परिसरात विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका दुचाकीजवळ तीन जण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना त्यापैकी एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार (29, रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), सचिन राजेंद्र खाडे (30, रा. अमानवस्ती, तीनखडी, ता. पाथर्डी) आणि अनिकेत दिलीप पटारे (22, रा. धामोरी, ता. नेवासा) अशी आहेत. पोलिसांनी लखन कासार याच्याकडे कसून चौकशी केली असता, जप्त केलेले गावठी कट्टे साथीदारांसह विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, लक्ष्मण उर्फ लखन कासार याच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी केली असता, उपविभागीय दंडाधिकारी, पाथर्डी यांनी 10 जानेवारी 2025 पासून दोन वर्षांसाठी त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असल्याचे समोर आले. लक्ष्मण कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारहाण, दरोडा, जाळपोळ, शस्त्रास्त्र कायदा, पॉक्सो तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. तसेच सचिन खाडे याच्यावरही पाथर्डी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न व आर्म्स अ‍ॅक्टसह अन्य गुन्हे दाखल आहेत. तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...