शिरूर |तालुका प्रतिनिधी| Shirur
परिसरात एमडी ड्रग्ज (अंमली पदार्थ) विक्री करणार्यांच्या तिघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने अटक करून त्याच्याकडून 47.60 ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण 21 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल मारूती मोरे (वय 20, रा. बाफना मळा, चंदननगर शिरूर), प्रतीक संतोष लंघे (वय 25, रा. करडे, शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय 26, रा. रामलिंग रोड, सावतामाळी नगर, शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानातर्गत अंमली पदार्थ विक्री व सेवनाविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे- 17 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्तीवर असताना, न्हावरा फाटा ते बाबूरावनगर रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर दोन वाहनांमध्ये काही व्यक्ती ड्रग्ज विक्रीसाठी थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत वरील तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी पोर्टर या डिलिव्हरी अॅपचा वापर करण्यात आला होता.
या अॅपद्वारे ड्रग्जची डिलिव्हरी घेणार्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू असून, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रॅकेटमधील मुख्य पुरवठादाराचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील रामलिंग फुलारी, पुणे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, सागर नामदास, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अमोल शेडगे, मंगेश भगत, सचिन घाडगे, अजित भुजबळ, राहुल पवार शिरूरचे पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) करीत आहे.
ड्रग्ज विकत घेणार्यांच्याही रक्तांचे नमुने शिरूर पोलिसांनी घेतले असून यात जर ते अमली पदार्थ घेत असल्याचे पुरावे वैद्यकीय विभागाने दिल्यास यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.





