अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्याच्या काही भागात आजपासून (26 डिसेंबर) 29 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 26 आणि 29 डिसेंबर रोजी विजांचा कडकडाट व वादळी वार्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच 27 आणि 28 डिसेंबर रोजी विजांचा कडकडाट व वादळी वार्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यापासून शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतकर्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असेल किंवा तसे नियोजन केले असल्यास शेतीमालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. स्वतःचे व जनावरांचे संरक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844/2356940 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे.