Friday, March 20, 2026
Homeक्राईमNashik Mhada Scam: म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानीच्या अडचणीत वाढ, नाशिकच्या 'बिल्डर लॉबी'चे...

Nashik Mhada Scam: म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानीच्या अडचणीत वाढ, नाशिकच्या ‘बिल्डर लॉबी’चे धाबे दणाणले!

नाशिक | प्रतिनिधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हक्काच्या घरावर डल्ला मारणाऱ्या ‘म्हाडा’ भूखंड घोटाळ्याचे धागेदोरे आता गडद होऊ लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि ‘हॅप्पी होम’चा संचालक संशयित सोनू मनवानी याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने येत्या २३ मार्चपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, या घोटाळ्याची व्याप्ती पाहता अनेक बड्या धेंडांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यताच आहे.

एक एकरपेक्षा जास्त भूखंडाचे ले-आउट करताना २० टक्के जागा म्हाडाला अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी देणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, मनवानी आणि त्याच्या साथीदारांनी या नियमाला हरताळ फासत, म्हाडाच्या हक्काच्या जागेचे लहान तुकडे पाडून त्यांची परस्पर विक्री केली. शासनाची आणि गोरगरिबांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तपासचक्र फिरवले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण साखळीत एका सत्ताधारी बड्या पदाधिकाऱ्याचे नाव चर्चेत असल्याने तपासाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

Nashik News: रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा ठरणारे रामकुंडाजवळील पांडे मिठाई जमिनदोस्त

सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आर्थिक व्यवहारांची साखळी शोधण्यासाठी मनवानीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोठडी वाढवून दिल्याने पोलिसांना आता या घोटाळ्यातील ‘मोठे मासे’ पकडण्यासाठी रान मोकळे झाले आहे. दरम्यान, आता न्यायालय या ४५ संशयितांच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेते आणि म्हाडाच्या जागेवर डल्ला मारणारे पुढचे ‘बिल्डर’ कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

न्यायालयात धाव, ‘नॉट रिचेबल’ची लाट
सोनू मनवानीच्या अटकेनंतर नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घोटाळ्यात तब्बल १९७ संशयितांची नावे समोर आली असून, त्यात ८४ मोठे विकासक पोलिसांच्या रडारवर आहेत. अटकेच्या भीतीने मागील तीन दिवसांत जवळपास ४५ हून अधिक विकासक आणि जागामालकांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. अनेक संशयित सध्या ‘नॉट रिचेबल’ असून काहींनी शहराबाहेर पलायन केल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या