Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik News: रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा ठरणारे रामकुंडाजवळील पांडे मिठाई जमिनदोस्त

Nashik News: रामकाल पथ प्रकल्पासाठी अडथळा ठरणारे रामकुंडाजवळील पांडे मिठाई जमिनदोस्त

पंचवटी | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू आहेत. त्यातील केंद्रशासनाचा महत्वाकांक्षी रामकाल पथ काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी अडथळा ठरणाऱ्या रामकुंड परिसरातील ‘पांडे मिठाई’ या दुकानावर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा हातोडा पडला असून शुक्रवारी (ता. २०) रोजी ते जमिनदोस्त करण्यात आले.

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी या भूमीला अनन्य साधारण असे धार्मिक व अध्यात्मिक महत्व प्राप्त आहे. दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. वर्षभर भक्त भाविक व पर्यटक यांची रेलचेल कायम असते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भक्त भाविक व पर्यटकांसाठी केंद्रशासनाचा “राम कालपथ” हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू आहे. रामकुंड परिसरातील रस्ते मोकळे करून प्रकल्पाला गती देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

पांडे मिठाईला नोटीस देण्यात येऊन ही जागा चौक सुधारण्यासाठी मोकळी करण्यास सांगण्यात आले होते. अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २०) रोजी येथील जागा सपाट करण्यात येणार असल्याचे नोटिशीव्दारे कळविण्यात आले होते. मात्र, ही जागा मोकळी करून दिली नसल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे पावणे बारा वाजता अतिक्रमण काढण्याचे काम सुरू करण्यात आले. दोन तासात पांडे मिठाई पूर्णपणे पाडण्यात आले.

Ashok Kharat: अमेरिकेतही खरातचा भक्त परिवार; मंदिराशेजारी आलिशान फार्महाऊस, पण, मंदिराची दानपेटी रिकामीच!

रामकाल पथ प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर मनपाने कठोर पवित्रा घेतला आहे. त्याअंतर्गत ‘पांडे मिठाई’सह इतर काही दुकानांवरही हातोडा चालविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. रामकुंड चौकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने पांडे मिठाईचे अतिक्रमण काढण्यात आले. कारवाई सुरू झाली तेव्हा दुकानदारांनी याला विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध करणाऱ्या महिलेला बाजूला नेले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात आली.

Amol Mitkari: भोंदू बाबा अशोक खरात आणि ‘VSR’ कंपनीचे कनेक्शन काय? अमोल मिटकरींचा ‘ट्विट’ बॉम्ब

या कारवाईवेळी अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, सहायक उपायुक्त मदन हरिश्चंद्र, डॉ. प्रज्ञा त्रिभुवन, राजाराम जाधव, पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, सातपूर विभागीय अधिकारी कैलास अहिरे, उपअभियंता जे. बी. राऊत तसेच कनिष्ठ अभियंते संतोष जोपळे, भूषण देशमुख, मिलिंद जाधव आणि अमित पवार उपस्थित होते. तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, अभिजित पैठणकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ताज्या बातम्या