Thursday, July 23, 2026
Homeक्राईमSonai : एमआयडीसीतील खत कंपनीवरील कारवाई संशयाच्या फेर्‍यात

Sonai : एमआयडीसीतील खत कंपनीवरील कारवाई संशयाच्या फेर्‍यात

तपास शून्य || 8 दिवसात कुणाचीच चौकशी नाही

सोनई |वार्ताहर| Sonai

पावसाने ताण दिलेला असताना अगोदरच मेटाकुटीस आलेला शेतकरी खते व बी-बियाणे रास्त भावात व बनावट मिळू नये यासाठी चिंतेत असतानाच पांढरीपूल एमआयडीसी (शिंगवेतुकाई ता. नेवासा) येथील बनावट खत निर्माण करणार्‍या कंपनीवर कृषी विभागाने टाकलेला छापा व त्याबाबत झालेल्या संशयास्पद कारवाईने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी संतप्त झाले आहेत.

- Advertisement -

अर्धवट कारवाई झाली मात्र तपासात अजुनही काहीच निष्पन्न झाले नसल्याने संबंधित कृषी विभागाचे अधिकारी व तपास असलेल्या पोलीस यंत्रणेबद्दल उघड चर्चेला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर- संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल एमआयडीसीत दि 15 जून रोजी 21 लाख 80 हजारांचा दुय्यम दर्जाचा खताचा साठा जप्त करण्यात आला होता. याबाबत कृषी अधिकारी यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने खतांच्या गोण्यांची पॅकिंग करण्यात आली होती. प्रशासनाने मोठा डंका वाजवत कारवाईचा फार्स उरकला पण 8 दिवसांत कारवाई मात्र शून्य असल्याचे दिसून येत आहे.

कंपनीच्या एका मालकावर कारवाई करताना त्याचे भागीदार मात्र फिर्यादीत घेतले नाही व तपासात सुध्दा कुणाचीच चौकशी करण्यात आली नसल्याने संशयाला जागा निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. संबधित कंपनी हा उद्योग केव्हापासून करत होती आणि कारवाई झाल्यानंतर कंपनीत अन्य संचालक असताना त्यांची साधी चौकशी पण का झाली नाही? आत्तापर्यंत ही खते कुठल्या दुकानदारांना विकली? दुसर्‍या कंपनीच्या गोण्या या ठिकाणी कशा आल्या? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

8 दिवस झाले तरी आरोपी अजूनही का सापडलेला नाही. यासह अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याने तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकर्‍यांचा या कंपनीने विश्वासघात केला असून शेतकर्‍यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. या प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पोलिसांना विचारणा केली असता 8 दिवसापासून तपास सुरु आहे एवढेच उत्तर मिळत आहे.

प्रशासन निर्धास्त !
महसूल,कृषी, अन्न व औषध तसेच इतर अनेक विभाग छापा टाकून कारवाई करतात व फिर्याद देऊन मोकळे होतात. येथून पुढे मात्र पोलीस यंत्रणा त्यावर कडक कारवाई करण्याऐवजी ‘अर्थपूर्ण व्यवहार’ घडून यावा याच प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे अनुभव असल्याने खत भेसळ प्रकरणी परीसरातील शेतकरी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...