अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला (वय 13) फिरायला नेण्याचे आमिष दाखवून चास (ता. नगर) शिवारातील एका लॉजिंगमध्ये नेऊन तिच्यावर तीन वेळा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून एका तरूणाविरूध्द शनिवारी (26 सप्टेंबर) अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश टकले (रा. भोयरे पठार, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा प्रकार जुलै व ऑगस्ट महिन्यात तसेच 19 सप्टेंबर रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 13 वर्षे 10 महिन्यांची असून ती अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहते.
संशयित अंकुश टकले याने तिला फिरायला जाण्याचे सांगून चारचाकी वाहनातून चास शिवारातील हॉटेल माथेरान लॉजिंग येथे नेले. तेथे तिच्या इच्छेविरूध्द तिच्याशी अश्लील वर्तन करून अत्याचार केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, हा प्रकार कोणाला सांगितल्यास बाहेर नेऊन मारून टाकण्याची तसेच मित्रांना आणून तिच्यावर अत्याचार करण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेबाबत पीडितेने 26 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




