मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अद्यापही काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराडचे नाव घेण्यात आले असून
तो दोन दिवसांपूर्वी पुण्यात सीआयडीला शरण आला होता. त्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची सीआयडीची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने विरोधकांकडून मुंडेंना टार्गेट केले जात आहे. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
यानंतर आता विरोधकांच्या टिकेला मंत्री धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “मी राजीनामा (Resignation) द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठलाही संबंध आहे. मात्र, उगीच कोणाचा तरी राजीनामा मागायचा? या प्रकरणात मी आरोपी नाही,माझा याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा, कुणाचा तरी राजीनामा मागायचा त्याच पद्धतीने काही जण माझा राजीनामा मागत आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टासमोर चालवावे. जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. अधिवेशनात देखील मी फास्टस्ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालले पाहिजे अशी मागणी केली आहे”, असे त्यांनी म्हटले.
तर विरोधकांकडून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Guardian Minister) धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की, “ता काय घडावं हे आम्हाला कळण्याआधी माध्यमांना कळते. आता मीच मंत्री, मीच पालकमंत्री का नसावं? हे विरोध करणाऱ्या लोकांना विचारलं तर अधिक योग्य होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच या तपासावर मंत्री म्हणून कोणताही प्रभाव माझा होऊ शकत नाही. सीआयडी, एसआयटी आणि न्यायलयीन तपास होणार आहे. त्यामुळे मंत्री म्हणून कोणताही प्रभाव होणार नसल्याचा”,दावाही यावेळी त्यांनी केला.
विजय वडेट्टीवारांना धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
बीडच्या प्रकरणाबाबत विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलतांना “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,”विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. मात्र, अशा पद्धतीने लहान आका आणि मोठा आका अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकत आहे.कोणाचा एन्काऊंटर आणि कोणाचं काय? एक तर बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्यामुळे कोणी काय बोलावं? आणि कोणाचं काय होणार? याला काहीही अर्थ नाही. मुळात बीड हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे ही मागणी मी सर्वात पहिल्यांदा केली होती”, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.