नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाली असून देशातील बहुतांश विमानतळावर प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी इंडिगोची पुण्यात येणारी २१ आणि येथून जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विस्कळीत सेवेचा गैरफायदा घेत इतर कंपन्यांनी तिकीट दर तिप्पट वाढवले आहेत. या सर्व घटनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे.
या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर आले आहे. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने तिकीट दरांत प्रचंड वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने नवे नियम लागू केले. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा नेमके कशामुळे विस्कळीत झाली? यासाठी नेमके जबाबदार कोण? याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘इंडिगोचा हा अत्यंत बेजबाबदारपणा’ असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात समिती नेमण्यात आली असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री मोहोळांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
इंडिगो देशातली ६५ टक्के विमानसेवा देते. आधीच पायलटची कमतरता आणि त्यातून ड्युटीचे तास दोन तासांनी कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. इंडिगोला सगळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली आहे. ४ सदस्यीय चौकशी समिती त्यासंदर्भात नेमली आहे. डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. इतर विमान कंपन्यांच्या किमतींवर कॅप लावली आहे. शिवाय ज्यांची विमाने रद्द झाली, त्यांना संपूर्ण रिफंड ४८ तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कालपासून परिणाम थोडा-थोडा कमी व्हायला लागला आहे. पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ५७ विमानसेवा होत्या. त्यातील आज ३७ विमानसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच्या चुकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ
इंडिगोचा गोंधळ कशामुळे उडाला?
“इंडिगोच्या झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. खरं तर इंडिगोच्या व्यवस्थापनाने मागच्या दोन ते तीन महिन्यांत काही तांत्रिक गोष्टी करायला हव्या होत्या, त्या न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आपल्या देशातील विमान सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोशिएशनने अशी मागणी केली होती की आमचा १० तासांचा कालावधी कमी करून ८ तासांचा केला जावा. दिल्ली उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील निर्देश दिले होते. त्यानंतर ताबडतोप डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले होते”, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
“फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) या नियमांची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, इंडिगोने शेवटपर्यंत त्यावर कोणतेही काम केले नाही. त्यामुळे १० तासांच्या कामाचा अवधी ८ तासांवर आला आणि त्यातच पायलट आणि विमानांमधील क्रू सदस्यांची कमतरता आणि त्यात कामांचा कालावधी दोन तास कमी झाला. त्यामुळे मनुष्यबळाची अचानक कमतरता जाणवली. त्यामुळे इंडिगोच्या व्यवस्थापनावर अचानक ताण वाढला आणि संपूर्ण गोंधळ उडाला”, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
“त्यानंतर भारत सरकारने गंभीर दखल घेतली आणि तात्काळ काही आदेश दिले. सर्वात आधी आता संपूर्ण व्यवस्था सुरळीत सुरू होण्यासाठी इंडिगोला काही कालावधी लागेल. त्यामुळे फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने चार सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच डीजीसीएने शनिवारी इंडिगोला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. चार सदस्यांची समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच पुढील कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगितले की झालेला प्रकार हा अतिशय बेजबाबदारपणाचा आहे. आता समितीने चौकशी केल्यानंतर जी काही माहिती समोर येईल त्या प्रमाणे कारवाई होईल”, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




