मुंबई | Mumbai
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव आल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) आरोपांच्या कचाट्यात सापडले आहेत. अशातच आता राजकारणात होणाऱ्या टीका-टिप्पणीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी व राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.
जालना (Jalna) येथे पर्यावरणमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांचा जाहीर सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी विरोधकांच्या टीका-टिप्पणीवर बोलतांना त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला. यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या की, ” राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात. मला तुमच्या नजरेत माझे वडील गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच यावेळी उपस्थितांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) अमर रहेच्या घोषणा दिल्या. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. बाकी कुणी केले नाही. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझं काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातांमध्ये द्यायचा आहे ते हात तयार झाले. मी पुढची निवडणूक (Election) लढणार नाही असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते”, असेही त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः हा विषय हातात घेतला असून यात संबंध आढळला तर, योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर, अन्याय व्हायला नको, असे त्यांचे मत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. तसेच तपास यंत्रणा त्यांना काळजी घेतील त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.