बीड | Beed
भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गेल्यात कित्येक दिवसांपासून कट्टर विरोधक झालेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच या कार्यक्रमाच्या भाषणावेळी मुंडे आणि धस यांच्यात कलगितुरा रंगल्याचे दिसून आले.
भाजप आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात बोलतांना देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली असा उल्लेख केला. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांनी हाच धागा पकडत “मलाही शिवगामी म्हणतात, शिवगामी बाहुबलीची आई असते. आज मला देवेंद्रजी तुमच्या बद्दल ममत्वाचा भाव येत आहे”, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त करत फडणवीसांचे कौतुक केले. तसेच शिवगामीचे वाक्य असते ‘मेरा वचन ही है मेरा शासन’ आणि जे जाहीर वचन मी सुरेश धसांना दिले आहे तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही. आज या कार्यक्रमात सुरेश धसांनी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगितला. सुरेश धस मी पण तुम्हाला आण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाही. आपलं प्रेमाचं नातं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला इज्जत देते”, असे त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या की,”आजच्या कार्यक्रमात (Program) पंकजा मुंडे येणार की नाही अशी चर्चा होती. पण मी का येणार नाही. सुरेश धस यांनी मोठ्या मुलाच्या लग्नात साडी आणि पत्रिका घेऊन मला आमंत्रण दिले होते. तेव्हा मी आले होते. आता लहान मुलाच्या लग्नातही मला बोलावले तर मी नक्की येईल. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे, शासन देवेंद्र फडणवीस यांचे आहे त्यात मी मंत्री आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री आहेत त्यामुळे मी आले. तसेच या कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसते, बसायला जागा नसती तरी मी आले असते. कारण मीही मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे, त्यामुळे मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले”, असेही पंकजा मुंडेंनी यावेळी आवर्जून सांगितले.
सुरेश धस काय म्हणाले होते?
आमदार सुरेश धस म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले होते की सुरेश धस तुम्हाला ३०० कोटी रुपये देतो आणि तुम्ही ते लगेच देऊन पण टाकले. आम्हाला दुसऱ्या कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. कारण, फक्त देवेंद्र बाहुबलीच आम्हाला ते देऊ शकतात. मी तुमचा लाडका असून ३.५७ टीएमसी पाणी शिरुर आणि पाटोदा तालुक्याला जायकवाडीमधून द्या. तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा असून ही योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहिल किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपचाच आमदार राहील, असे त्यांनी म्हटले.
तसेच मी बोललो की काहीजण म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील आणि बबनराव ढाकणे यांना निवडून दिले. प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या एवढा पहाडासारखा माणूस दिला. आज ज्या जमिनीवर या कामाचा शुभारंभ होऊन जो प्रकल्प उभा राहत आहे ती जमीन रक्षा विभागाकडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नाडीस हे रक्षामंत्री होते. मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडेंचे योगदान सांगितले होते.