मुंबई | Mumbai
लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र काहींनी त्यातील एका दृश्यावरून आक्षेप नोंदवला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. यानंतर आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली आहे.
यावेळी बोलतांना सामंत म्हणाले की, “दिग्दर्शकांनी ‘छावा’ या चित्रपटातील छत्रपची संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) नाचण्याचा भाग काढून टाकला आहे. यासाठी मी स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला होता. त्यामुळे आता नृत्य दाखवल्यावरून झालेला वाद थांबला असेल, अशी अपेक्षा आहे, असे सामंत यांनी म्हटले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा सामंतांनी दिला होता. या चित्रपटाविषयी त्यांनी एक्स (ट्विटवर) अकाऊंटवर पोस्ट देखील लिहिली होती.
सामंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे,” असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता ‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटातील तो वादग्रस्त भाग काढला आहे.
दरम्यान, ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल (Actor Vicky Kaushal) रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.