पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देणार. त्याचसोबत घाट माथ्यावर वाहून जाणारे पाणी कृष्णा व गोदावरी खोर्यात सोडून सिंचन क्षमता वाढवू. पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प महायुतीचा आहे. पारनेरच्या दुष्काळी भागातील सर्व योजना कार्यान्वित करून पठार भागाला पाणी देणार असल्याचे आश्वासन नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील कान्हुर पठार येथे दिले. मंत्री विखे यांची राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा तालुक्याच्यावतीने सत्कार व पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना विखे पाटील म्हणाले, पारनेरचा विकास दहशतीमुळे खुंटला असून तालुका ठेकेदार, माफियाराज आणि गुंंडगिरीला बळी पडला आहे. पाणी आणायचे म्हणजे एमआयडीसीमध्ये ठेकेदारी करायची नव्हे, असा टोला खा. नीलेश लंके यांचा नामोल्लेख न करता लगावत पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार, जातेगाव, पुणेवाडी, राळेगणसिद्धी सर्व प्रलंबित असलेल्या पाणी योजनांच्या सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील म्हणाले, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे घाटावरून वाहणारे पाणी पूर्वेच्या कृष्णा व गोदावरी खोर्यात सोडून सिंचन क्षमता वाढवणे हे स्वप्न पूर्ण करणारच आहे. पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना खरीप, रब्बी हंगामाचा पिीकविमा, वीज बिल माफी, लाडकी बहीण योजना याद्वारे कोट्यवधी रुपये मिळवून दिले. आश्वासनांची पूर्तता केल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. आता भूमिपुत्रांना सुपा एमयडीसीमध्ये नोकरी देणार आहोत. तालुक्यातील माफियाराज, दहशत मोडून काढणार असून यामुळेच विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काशिनाथ दाते यांना निवडून दिले. आमदार दाते म्हणाले, उपसासिंचन योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने त्या रखडल्या गेल्या. गोदावरी खोर्यातील पाणी अडवण्यासाठी शासनाने घातलेली बंदी उठवावी. कुकडीचे पाणी शेवटच्या टेल टँकपर्यत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
… तर पारनेरमध्ये रेडबूलची फॅक्टरी
पारनेर तालुक्यातील युवकांना सुपा एमआयडीसीमध्ये रोजगार मिळलाच पाहिजे. परंतू, येथील काहींच्या दहशतीमुळे चांगल्या कंपन्या येथून बाहेर जात आहेत. विधानसभा निवडणुकीत पारनेरमधील दहशत मोडित काढून चांगला उमेदवार निवडून दिला. अन्यथा पाच वर्ष जनतेला रेडबूल प्यावे लागले असते. पारनेरमध्ये रेडबूलची फॅक्टरीच निघाली असती, अशी मिश्किल टिप्पणी मंत्री विखे यांनी खा. लंके यांचे नाव न घेता केली. दरम्यान, नगर-श्रीगोंद्यातील 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लावणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.