नांदेड | Nanded
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती संकटात आली असून शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे चिंतेत असताना नांदेडमध्ये झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळी बैठकीत एक संतापजनक प्रकार समोर आला. दुष्काळासारख्या संवेदनशील मुद्द्यावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याआधी चक्क काजू बदामावर ताव मारला. शेतकऱ्यांप्रति दाखवलेल्या असंवेदनशीलमुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अधिकारी- नेतेमंडळींनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा संतप्त भावना विरोधकांनी व्यक्त केल्या. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरूनही टीका सुरू झाली आहे.
नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, विविध खासदार, आमदार तसेच अधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप पिकांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाई आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच ही बैठक पार पडली.
संपादकीय : १९ सप्टेंबर २०२६ – हित खाजगी साखर कारखान्यांचेही हवे
संजय जाधव माध्यमांवर चिडले
विशेष म्हणजे या बैठकीत उपस्थित असलेले मंत्री, आमदार, खासदार काजू बदामावर ताव मारत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्व सामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव यांनी होऊ द्या माझ्यावर टीका, माध्यमांनी हा फालतू प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना तावातावाने सांगितले.
मराठवाड्यासह विदर्भातील पिके करपून गेली आहेत. सोयाबीन, कडधान्ये शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. राज्यातील मोठी धरणे बऱ्यापैकी भरली असली तरी छोटी धरणे भरलेली नाहीत. त्यामुळे खरीपाचे पिक हातातून गेले आता रब्बी पिकांचे काय होणार, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आज शनिवारी (19 सप्टेंबर 2026) बैठक झाली. बैठक दुष्काळ आढाव्यावर असतानाही मंत्री, लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारताना दिसत असल्यामुळे विरोधकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही खासदार संजय जाधव काजू-बदामावर ताव मारत असल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.
विरोधकांची टीका
या बैठकीत शिवसेना (शिंदे) खासदार बंडू जाधव काजू-बदाम खाताना दिसल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना मंत्री काजू-बदाम कसे खाऊ शकतात, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी विचारला आहे. यांना राज्यातील परिस्थितीची जाणीव तरी आहे का, असा दानवे यांनी सवाल केला आहे. तर शेतकऱ्यांच्या दु:खाची यांना काहीच जाणीव नसल्याची टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
अशा वेळी संवेदनशील राहिले पाहिजे- मुख्यमंत्री
याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासनावर खापर फोडलं आहे. बैठकीच्या वेळी प्रशासन ड्राय फूट आणते. मात्र, दुष्काळाची बैठक असताना हे टाळायला हवं होतं. अशा वेळी संवेदनशील राहिले पाहिजे, या शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान टोचले. त्याचवेळी दुष्काळ आहे म्हणून कुणी हे जाणूनबुजून केले नाही, अशी बाजूही सावरली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यात आढावा घेण्यास सांगितले आहे. पावसाचा खंड पडल्याने पिकं खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. तसेच दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले




