नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आयुष्यभराची पुंजी सुरक्षित राहावी आणि पेन्शनच्या पैशांवर चांगला परतावा मिळावा या आशेने एफडी (फिक्स डिपॉझिट) (Fine Securities) करू पाहणाऱ्या एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाचे तब्बल ८६ लाख रुपये घेत फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
घटनेतील संशयित एजंट विजय वाघमारे याने बनावट (Fake) पॉन्झी स्किमचेच गाजर दाखवले नाही, तर या गुन्ह्याला अधिकृत स्वरूप देण्यासाठी इंडसइंड बँकेचे बनावट बँक स्टेटमेंट्स तयार करून खोटे शिक्के मारून वृद्धाची दिशाभूल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित वाघमारे कुटुंबासह पसार झाला आहे.
म्हसरूळ हद्दीतील (Mhasrul Area) समृद्धी कॉलनीयेथील रहिवासी ७४ वर्षीय सेवानिवृत्त चंद्रभान सांडू परचुरे आणि त्यांच्या पत्नी सौ. पुष्पलता यांना भविष्याचे नियोजन करण्याचे आमिष दाखवून एजंट विजय सुधाकर वाघमारे याने जाळ्यात ओढले. दि. १९ मे २०२३ ते १६ जुलै २०२६ या कालावधीत वाघमारे याने परचुरे यांच्या घरी वारंवार जाऊन फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम गुंतविल्यास जास्तीचे व्याज आणि परतावा मिळवून देतो, असे खोटे आश्वासन दिले.
परचुरे दाम्पत्याचा विश्वास संपादन केल्यानंतर वाघमारे याने त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखा दिंडोरी रोड (Dindori Road) येथील खात्याचे चेक मिळवले. हे चेक स्वतःच्या फाइन सिक्युरिटीजच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. कंपनीत पैसे गुंतवल्याचे सांगून वाघमारे याने हे सर्व पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि त्यावर मौजमजा केली.
अशी उघडकीस आली बनावटगिरी
काही काळ उलटल्यानंतर परचुरे यांनी गुंतवलेल्या रकमेचे अधिकृत फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र मागितले, तेव्हा संशयित वाघमारे याने फसवणुकीचा नवा डाव रचला. त्याने इंडसइंड बँकेचे हुबेहूब बनावट बँक स्टेटमेंट्स तयार केले आणि त्यावर बँकेचे खोटे शिक्के मारून परचुरे यांना दिले. यामुळे परचुरे यांना आपले पैसे सुरक्षित असल्याचा भास झाला. मात्र, परतावा मिळणे बंद झाल्यावर आणि संशय आल्यावर पडताळणी केली असता तब्बल ८६ लाख १ हजार ४७ रुपयांची फसवणूक झाल्याचे परचुरे यांच्या लक्षात आले.
कुटुंबासह पसार; कसून शोध
फसवणूक उघडकीस आल्याचे समजताच विजय वाघमारे हा वृद्ध दांपत्याचे आयुष्यभराचे पैसे लाटून कुटुंबासह फरार झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. १७) सायंकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक अतुललडहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन तपास करत असून पसार वाघमारेचा शोध सुरू आहे.




