संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान (Wadgaon Pan) येथील तेरा वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड अॅसिड हल्ल्याच्या (Acid Attack) निषेधार्थ माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नागरिक व परिसरातील महिला, विद्यार्थिनी युवक यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत भव्य रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात चालले काय? असा सवाल करून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे, अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात (Jayashreetai Thorat) यांनी केली आहे.
वडगाव पान येथील तळेगाव फाटा येथे सर्वपक्षीय नागरिकांच्यावतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद थोरात, अर्जुन काशीद, सरपंच श्रीनाथ थोरात, रूपाली थोरात, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, रवींद्र मैड, सुधीर थोरात, आबासाहेब थोरात, भाग्यश्री शिरसाट, आनंद वर्पे, रावसाहेब जंबुकर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडगाव पान मधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या, लहानग्या चिमुकलीवर झालेला अॅसिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. परवाच पठार भागातील एका युवतीवर चाकूने हल्ला (Attack) झाला. महिलांची मानसिकता खराब करण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. संगमनेर (Sangamner) तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. अशी परिस्थिती येथे कधीही नव्हती. अशा घटना घडतात कशा? असा सवाल करून आरोपीला तातडीने पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच सरकारने महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे केले पाहिजे.
समाज म्हणून राजकारण, पक्ष, जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आले पाहिजे. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी ती माहिती प्रशासनाला दिली पाहिजे, असे आवाहन करून विविध महाविद्यालय, शाळा परिसरात तसेच प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले पाहिजे. तसेच महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिसांची गस्तही सुरू केली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केली. डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या, संगमनेर शहरामध्ये महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे त्याच पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावांमध्ये महिलांच्या सुरक्षेतेसाठी रक्षक दल निर्माण करावी लागतील.
यावेळी अर्जुन काशीद, श्रीनाथ थोरात, नीलम खताळ, रूपाली थोरात,पद्मा थोरात यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी रस्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले याचबरोबर आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे त्यांनी सांगीतले.





