अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
युवक व त्याच्या आईच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जयदीप अपार्टमेंट, डॉन बॉस्को शाळेजवळ, कॉटेज कॉर्नर येथे घडली. दिशा स्वप्नील बागुल (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिची आई झेनित स्वप्नील बागुल (वय 39) यांनी शनिवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अंश रत्नपारखी व त्याची आई (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी झेनित एका शाळेत शिक्षिका आहेत. त्या गुरूवारी (9 जानेवारी) सकाळी शाळेत असताना दिशाचा मित्र अंश रत्नपारखीच्या आईने फोन करून अंश घरी नसल्याचे सांगून दिशाबाबत विचारणा केली. त्या वेळेस दिशाचा फोन व्यस्त होता. रत्नपारखी यांनी झेनित यांना ‘दिशाला नीट करेल’ अशी धमकीही दिली. दरम्यान, झेनित शाळेत असताना व घरी परत येत असतानाही दिशा फोन उचलत नव्हती. त्या घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला व आत प्रवेश करताच दिशा हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, दिशाचा मित्र अंश रत्नपारखी आणि तिची ओळख शाळेपासून होती. अंशकडून त्रास होत असल्याने झेनित यांनी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. अंशने पोलिसांसमोर माफी मागून संबंध तोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अंश व त्याची आई यांच्याकडून दिशाला फोन करून त्रास दिला जात होता. दिशाला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झेनित बागुल यांनी अंश रत्नपारखी आणि त्याची आई यांच्यावर केला आहे. पोलिसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे.