Sunday, May 31, 2026
HomeनगरAhilyanagar : आमदार कर्डिले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश!

Ahilyanagar : आमदार कर्डिले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश!

पडद्यामागचे सूत्रधार डॉ. विखे पाटलांचा ‘डबल स्ट्राईक’

मुंबई/अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांना आमदार करण्यापासून ते राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) बडे नेते प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये आणण्यापर्यंतच्या संपूर्ण घडामोडींमागे डॉ. सुजय विखे पाटील हेच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी दोन मोठे राजकीय डाव यशस्वी करत त्यांनी जिल्ह्यात भाजपसाठी ‘डबल स्ट्राईक’ केला आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख नेते, माजी राज्यमंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी अखेर शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मुंबई येथील पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पार पडला. भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवार गटासाठी हा जिल्ह्यात खूप मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना विजयी करण्यापर्यंत डॉ. विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षांतर्गत समन्वय साधत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी सातत्याने संपर्क ठेवला. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर स्वतः मैदानात उतरून राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली. तब्बल 11 हून अधिक सभा घेत त्यांनी पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधले व कर्डिले यांच्या विजयासाठी निर्णायक वातावरण निर्माण केले. तसेच तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नये, यासाठी पडद्यामागे चक्रे फिरली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या 6 महिने आधीपासूनच डॉ. विखे पाटील हे प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्कात होते.

जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज घेत त्यांनी तनपुरे यांच्याशी संवादाची दारे खुली ठेवली. याच प्रदीर्घ रणनीतीचा पुढचा टप्पा म्हणून तनपुरे यांचा भाजप प्रवेश सुकर झाला. अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा प्रभावी चेहरा भाजपमध्ये आणणे, अशा दोन्ही आघाड्यांवर डॉ. विखे पाटील कमालीचे यशस्वी ठरले आहेत. या डबल स्ट्राईकमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद कैक पटीने वाढली असून, विखे पाटलांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दोन दादांचा अलिंगन सोहळा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंसारखा प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्यामुळे पक्षाला फायदाच होईल, हे आवर्जून सांगितलं. पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदर चव्हाण यांचा व त्यानंतर डॉ. सुजय विखेंचा सत्कार केला. याच सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले. आजोबानंतर आता नातूही एक झाले याची आठवण आवर्जून काढली. त्यावेळी एकच हाशा पिकला. सुजय विखे व प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेला एकमेकांच्या विरोधात काम केलं होतं. परंतु आता तनपुरे-विखे ही नवी युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशा विश्वास तनपुरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. हे...