संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
आत्तापर्यंत जी हिंदुत्ववादी आंदोलने व मोर्चे निघाले त्यामध्ये आपण कायमच सहभागी होत होतो. मात्र ते कधीही त्यात सहभागी झाले नाही. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली असून त्यांचा पराभव झाल्यानंतर खर्याअर्थाने त्यांना आता हिंदुत्वाची आठवण यायला लागली असल्याची टीका महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर केली. सकल हिंदू समाजाचा मोर्चा संपल्यानंतर आमदार अमोल खताळ काही वेळ शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी थांबले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात कुठलेही राजकारण न आणता सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा निघणार होता. त्यामुळे त्यांनी या मोर्चाच्या अगोदर मोर्चा काढणे हे दुर्दैव आहे. त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मोर्चा काढला हा प्रकार केविलवाणा वाटत असल्याची टीका आमदार खताळ यांनी केली.
आत्तापर्यंत त्यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यापैकी तीनवेळा त्यांचे मतदान ईव्हीएम मशिनवर झाले, लोकसभेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. तसेच कर्नाटक, राजस्थान व इतर राज्यात काँग्रेसचे सरकार आले त्यावेळी त्यांना ईव्हीएमवर शंका आली नाही. मात्र आत्ताच त्यांना ईव्हीएमवर शंका येऊ लागली हे त्यांचे दुर्दैव आहे. लोकशाहीमध्ये झालेला पराभव हा मान्य करून तो स्वीकारायचा असतो. परंतु ईव्हीएमला दोष देणे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
ईव्हीएमवरुन दिले खुले आव्हान..
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ज्याठिकाणी त्यांनी ईव्हीएम मतमोजणी पुन्हा करण्यासाठी अर्ज दिला आहे, तिथे त्यांनी मोजणी केली तरी माझी मते निश्चितच वाढतील. परंतु त्यांना ज्या मोहल्ल्यात अगर गावात जास्त मते मिळाली त्या भागातली सुद्धा त्यांनी मोजणी केली तर ते चांगलं राहील, असे खुले आव्हान आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना दिले.