नाशिक | Nashik
महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी माध्यमांद्वारे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामध्ये दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कृषीखाते मिळाले आहे. आमदार भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांच्याऐवजी कोकाटेंना मंत्रिपद दिले गेले, यामुळे भुजबळ हे काहीसे नाराज आहेत.
तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिपद मिळाल्याने ते चांगलेच जोमात आहेत. त्यामुळे कोकाटे हे भुजबळांना टोला लगावण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. काल पुण्यात पत्रकारांशी बोलतांना कोकाटे यांनी पक्षाने छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले असून आणखी किती लाड करायचे? असे म्हणत टोला लगावला होता. तसेच माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, बाकी कोणी नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज कोकाटे यांच्या टीकेला आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांना मला सांगायचं आहे की मी शरद पवारांसह (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. कोकाटे हे उपरे असून ते पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीत नव्हते. त्यावेळी शरद पवारांना मी बोललो ते कोकाटे यांना घ्यायला तयार नव्हते. परंतु, मी आग्रह केला म्हणून त्यांना पक्षात घेतले. तुम्ही काल आला आहात, मला बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? पक्ष आणि मी बघून घेईल,” असे म्हणत त्यांनी मंत्री कोकाटेंना प्रत्युत्तर दिले.
माझ्या सगळ्या भावनाच मेल्या
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी माझी समजूत घालणार असल्याचे म्हटले असले, तरी आमची कुठलीही भेट किंवा बातचित झालेली नाही. तुमच्या भावनांशी खेळलं जात आहे का? असा प्रश्न भुजबळांना पत्रकारांनी विचारला असता, मला कुठलेही भाष्य करायचे नाही, आजकाल माझ्या सगळ्या भावनाच मेल्या आहेत, असे उत्तर त्यांनी दिले.