श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
आपण जो विश्वास दाखवला जे आशीर्वाद दिले. यासाठी मी कायम आपला ऋणी राहील, जो लोकहिताचा वारसा स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी जपला तोच वारसा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढे चालू ठेवू, आपण दिलेल्या आशीर्वादामुळे ही संधी मला मिळाली आपण सगळेच आमदार आहात. श्रीरामपूर जिल्हा करणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मातोश्री मंगल कार्यालय येथे महाविकास आघाडीच्यावतीने मतदारांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय फंड होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, खंडकरी शेतकरी नेते बी.डी पाटील, कॉ.अण्णा पाटील थोरात, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ.ओगले म्हणाले, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींचे मी आभार मानतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण आमदार हेमंत ओगले यांच्या पाठीशी उभे राहिलात. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ काँग्रेस पक्ष आणि संघटनेसाठी आपण जी एकजूट दाखवली. त्यासाठी मी आपला आभारी आहे. येणार्या सगळ्या निवडणुका आपण अशाच ताकदीनिशी लढवू आणि विजय संपादन करू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक करताना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले, ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेची होती. अनेकांनी या निवडणुकीला वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु महाविकास आघाडी आणि स्वर्गीय ससाणे साहेबांची संघटना यांनी एकजुटीने तो प्रयत्न हाणून पाडत विजय संपादन केल्याचे श्री.गुजर यावेळी म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय छल्लारे, अशोक थोरे, ज्येष्ठ नगरसेवक अंजुमभाई शेख, अशोक उपाध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, जिल्हाध्यक्ष संदीप मगर, माजी अधिकारी दत्ता कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, सचिन म्हसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी शेजुळ, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, शामलिंग शिंदे, दिलीप नागरे, आशिष धनवटे, दत्तात्रय सानप, प्रणिती चव्हाण, कलीम कुरेशी, रितेश रोटे, मनोज लबडे, बाळासाहेब खांदे, बाळासाहेब आढाव, गोरख नाना पवार, वैभव गिरमे, सोमनाथ गांगड, रमेश कोठारी, पंडितराव बोंबले, बाबासाहेब मोरगे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, सुनील बोलके, नितीन आसने, अॅड. प्रमोद वलटे, महंता यादव, भास्करराव लिप्टे, भाऊसाहेब मुठे, कृष्णा मुसमाडे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अॅड.समीन बागवान यांनी केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा तसेच परभणी येथे पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ ठराव करण्यात आला.