सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात, पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील, तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे विरोधकांना टोला लगावला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकार आणि राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहेत. संपूर्ण राज्य या परिस्थितीला तोंड देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचा आरोप भाजपातील नेत्यांकडून केला जात आहे. आता विरोधकांच्या आरोपाचा आमदार रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना रोहित पवार यांनी भाजपाला चिमटा काढला आहे.




