Saturday, August 15, 2026
HomeनगरMLC Election : नगरमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारच नाही

MLC Election : नगरमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारच नाही

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार (दि. 1) शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने तलवार म्यान केल्याचे दिसून आहे. शेवटच्या क्षणी खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल न करता अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारच न दिल्याने महायुतीतील भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग सुकर झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय पानसरे यांनी अचानक दुपारी अडीचच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. अर्थात पानसरे हे अर्ज ठेवणार की मागे घेणार याचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. 4 जूनला गुरुवारी यापैकी कोण माघार घेते व रिंगणात कितीजण राहतात की निवडणूक बिनविरोध होते, याची उत्सुकता वाढली आहे.

महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राणी लंके यांना उमेदवारी जाहीर केली होती. जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनीही आघाडीकडून त्या अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले होते, पण दुसर्‍या दिवशी अचानक यु-टर्न मारण्यात आला. राणी लंके अर्ज दाखल करण्यासाठी आल्याच नाही. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संपर्क केला असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला जाहीर झाल्याने आघाडीचा धर्म पाळण्यासाठी लंके यांनी अर्ज दाखल केला नाही. काँग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष ससाणे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट ससाणे यांना मतदान करणार आहे. त्याबरोबर काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षाही जास्त मतदार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार राहणार असून राष्ट्रवादी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे वर्पे म्हणाले.

प्रत्यक्षात मात्र काँग्रेसकडून कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. ससाणे यांचा अपक्ष अर्ज आहे. त्यांनी पक्षाचा अर्ज दाखल केला नाही की पक्षाचा एबी फार्म जोडला नाही. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारच दिला गेला नसल्याने महायुतीला एका प्रकारे बाय दिला असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, रविवारी लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू अचानक लंके यांनी माघार का घेतली. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे मामा आहे आणि खासदार लंके हे जयंत पाटील यांच्या शब्दाच्या पुढे नाही. तसेच पक्षाकडून राणी लंके यांना उमेदवारीबाबत कोणताही आदेश नव्हता.

तरीही राणी लंके या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. पण आज त्यांनी तलवार मान्य केल्याचे चित्र दिसून आहे.
महायुतीकडून भाजपचे तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दोन दिवसांपूर्वीच अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या दोघांशिवाय निवडणूक रिंगणात श्रीगोंद्याचे राज्य फेडरेशनचे संचालक दत्तात्रय पानसरे, कमलेश हस्तीमल गांधी व मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ या अन्य तीन उमेदवारांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. 4 जूनला गुरुवारी यापैकी कोण माघार घेते व रिंगणात कितीजण राहतात की निवडणूक बिनविरोध होते, याची उत्सुकता वाढली आहे.

ऐनवेळी कोणी घातला घोळ

उमेदवारी अर्जावरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकमेकांकडे बोट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने नाट्यमय माघार घेतली आहे. खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केल्यानंतर पक्षाने अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रसने देखील एबी फॉर्म असतांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल न करण्यावरून काँग्रेस आणि शरद पवार गटाने एकमेकांकडे बोट दाखवत घोळ घातला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल होणार नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी स्वतः ही माहिती दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्यासाठी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडूनही तशा सूचना आल्या आहेत.

यापूर्वी वर्पे यांनीच राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतच चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर राष्ट्रवादीने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले. ससाणे यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार रिंगणात राहिला आहे. दरम्यान, एबी फॉर्म असतांनाही काँग्रेसने तर ऐनवेळी घोषणा करून काँग्रेसचे नाव पुढे करत राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस की राष्ट्रवादी यापैकी कोणी घोळ घातला याबाबत वेगवेगळे तर्कविर्तक लावण्यात येत होते.

ताज्या बातम्या

Independence Day : नाशिक महापालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन (Independency Day) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर हिमगौरी...