मुंबई | Mumbai
मराठीच्या मुद्दावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने आता क्रिकेट सामन्यांचे मराठीत समालोचन झाले पाहिजे, अशी भूमिका घेत डिज्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केलं. मनसेचे नेते अमय खोपकर तसेच पक्षाचे संतोष धुरी, केतन नाईक यांनी वरळी येथील हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
या प्रकरणी मनसेने हॉटस्टार कंपनीचे कार्यालय गाठल्यानंतर ही कंपनीचे अधिकारी वेळ देत नसल्याने काही काळ वातावरण तापले होते. पण पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अमेय खोपकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ॲपवर मराठीत समालोचन उपलब्ध करुन द्यावे असे लिहून देत नाही तो पर्यंत कार्यालयातून जाणार नाही अशी भुमिका अमेय खोपकर यांनी घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तुम्ही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल अमेय खोपकर यांनी जाब विचारला.
हॉटस्टारने दिले लेखी आश्वासन
हॉटस्टारने क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अमेय खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “मी भेटायला नव्हे तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर यासारखी शोकांतिका कोणतीही नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आम्हाला भांडावे लागते. हॉटस्टारवर जे सामने दाखवले जातात, त्यांचे मराठी भाषेतही समालोचन दाखवू, हे आम्ही जोपर्यंत लेखी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले होते. त्यानंतर हॉटस्टारतर्फे राज ठाकरे यांच्या नावाने आम्हाला पत्र मिळालेले आहे, अशी माहिती दिली.
खोपकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी माणसानेच करायचा इतर माणसांनी दादागिरी करायची नाही. हॉटस्टारमध्ये लवकरच मराठीत समालोचन सुरू करत आहेत. मी त्यांचा अभिनंदन करतो. मी बाकी मराठी माणसांना सुद्धा विनंती करतो की सामना पाहताना मराठी भाषेचाच वापर करावा.
“महाराष्ट्रात राहून इथे व्यवसाय करुन डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेटचे समालोचन हिंदी, गुजराती, मल्याळी, तेलुगु, भोजपुरी या सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण मराठीत उपलब्ध नाही. हे अजिबात चालणार नाही. ही समज नाही तर धमकी समजा. पण मराठीत समालोचन तातडीने उपलब्ध झाले पाहिजे. नाहीतर डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयाच्या काचा खूप महाग आहेत हे लक्षात ठेवा”, असा आक्रमक पवित्रा यावेळी अमेय खोपकर यांनी घेतला.