मुंबई | Mumbai
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधना यांचे नाव घेतले होते. त्यामुळे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी संतापली आहे. प्राजक्ताने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच मनसेचा एक बडा नेता प्राजक्ताच्या समर्थनार्थ धावला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे समर्थन करताना आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले अमेय खोपकर
मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक्सवर पोस्ट करत भाजप आमदार सुरेश धस यांना इशारा दिला आहे. त्यानुसार, “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारे आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते धस?
परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केले जाते. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचे शिक्षण घ्यावे आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला धस यांनी लगावला होता. त्यामुळे प्राजक्ता माळी या संतापल्या असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एखाद्या गंभीर प्रकरणाच्यावेळी काहीही संबंध नसताना कलाकारांची नावे घेणे कितपत योग्य आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
प्राजक्ता माळी भुमिका मांडणार?
दरम्यान, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने नावाचा उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. प्राजक्ता माळीने धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्राजक्ता आधी महिला आयोगात तक्रार करून पत्रकार परिषद घेणार की पत्रकार परिषदेनंतर तक्रार करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.