Saturday, November 7, 2026
Homeराजकीयमोदी कॅबिनेटमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत; ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

मोदी कॅबिनेटमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत; ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

दिल्ली । Delhi

भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नवी यादी जाहीर करताच, देशाच्या राजधानीत अचानक राजकीय खळबळ उडाली आहे. या नव्या यादीत पक्षाने विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा या दोन अत्यंत वजनदार मंत्र्यांचे पत्ते कट केले आहेत. भाजपच्या या धक्कादायक आणि अनपेक्षित निर्णयामुळे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे.

- Advertisement -

संविधानातील कलम ७५(५) च्या नियमानुसार, कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला पदावर टिकून राहण्यासाठी संसदेच्या (लोकसभा किंवा राज्यसभा) कुठल्याही एका सभागृहाचे सदस्य असणे कायदेशीररीत्या बंधनकारक असते. एखादी व्यक्ती सलग ६ महिने खासदार नसेल, तर त्याला मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागते. हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा या दोन्ही दिग्गजांचा उच्च सभागृहातील (राज्यसभा) कार्यकाळ येत्या नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. पक्षाने या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्याने, त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

पक्षातील विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या या संभाव्य फेरबदलात किमान ४ नव्या चेहऱ्यांना स्थान दिले जाऊ शकते. यात आधीच राजीनामा दिलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांच्यासह पुरी व वर्मा यांच्या जागी नव्या रणनीतिक नेत्यांचा समावेश केला जाईल. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रवनीत सिंग बिट्टू यांच्यावर भाजप संघटनेत मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशातील ८ जागांवर पक्षाने जुन्या सर्व ८ खासदारांना डावलून संपूर्णपणे नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. या माध्यमातून भाजपने जातीय आणि प्रादेशिक समतोल अत्यंत कौशल्याने साधला आहे. या नव्या यादीत दोन महिला, दोन ब्राह्मण, तीन इतर मागासवर्गीय (OBC) आणि एका ठाकूर नेत्याचा समावेश आहे. पक्षाने ‘नो रिपीट पॉलिसी’ राबवत नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचे धोरण स्पष्ट केले असले, तरी आता केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार

0
घोटी । जाकीर शेख Ghoti इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून...