पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
नगर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला गुरुवारी (दि. 15) भाविकांची गर्दी उसळली. आई जगदंबेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक गडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. वाढत्या गर्दीचे नियोजन करताना श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टने दर्शन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या व्यवस्थेमुळे भाविकांना दिलासा मिळत आहे. त्यातच रुंद झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होत असल्याचे चित्र दिसून आले.
शारदीय नवरात्रोत्सवात मोहटादेवी गडावर दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी भरते. नवरात्रातील प्रत्येक माळेला दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या वाढत असून पाचव्या माळेला गडावर विशेष गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबासह आलेले भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होत होते.
नवरात्रोत्सवासाठी येणार्या भाविकांना कमीत कमी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनरांगांचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे, प्रवेशमार्ग सुरळीत ठेवणे आणि आवश्यक ठिकाणी कर्मचार्यांची व्यवस्था करणे, यावर भर देण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शन व्यवस्थेत शिस्त राखण्याबरोबरच कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा दक्ष आहेत.
यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने परिसरात दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट आहे. अशा स्थितीत नवरात्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणार्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. गर्दीच्या काळात पाणी आणि अन्य मूलभूत सुविधा सुरळीत उपलब्ध राहाव्यात, यासाठी देवस्थान ट्रस्टने नियोजन केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गड परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची गर्दी, वाहनांची वर्दळ आणि दर्शनासाठी होणारी ये-जा यांचे नियोजन करताना सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. गर्दीच्या वेळी उद्भवणार्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर भाविकांना तातडीने आरोग्यविषयक मदत मिळावी, यासाठी आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहटादेवी गडाच्या विकासकामांतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने वाहतुकीला अधिक मोकळीक मिळाली आहे. यापूर्वी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी आणि वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीवर ताण निर्माण होत असे. मात्र, रुंद रस्ते आणि वाहतुकीच्या सुधारित व्यवस्थेमुळे वाहनांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसांतही मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छता, पिण्याचे पाणी, दर्शनरांगांचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षितता या बाबींवर देवस्थान ट्रस्टसह संबंधित यंत्रणांना सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे. आई जगदंबेच्या दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण ठरत आहे.




