पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
मोहटादेवी नवरात्र महोत्सवासाठी येणार्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये. सर्व विभागांनी समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत. भाविकांच्या सुविधांबाबत हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा यात्रा नोडल अधिकारी प्रसाद मते यांनी केले. श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचा शारदीय नवरात्र महोत्सव 11 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देवस्थानच्या सभागृहात बैठक झाली.
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सुविधांची माहिती दिली. बैठकीस देवस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार उद्धव नाईक, पाथर्डी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, अॅड. विक्रम वाडेकर, बाळू लाहोटी, बाबासाहेब दहिफळे, सरपंच मनीषा पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले व कर्मचारी उपस्थित होते.
मोहटादेवीकडे जाणार्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, साइडपट्ट्या दुरुस्त करणे, अतिक्रमणे हटविणे, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग क्र. 61, मराठवाडीतील खराब रस्ता व पाथर्डी शहरातील मोडकळीस आलेल्या साइड गटारांबाबतही चर्चा झाली. कामांमध्ये दिरंगाई झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रतिनिधींवर मते यांनी नाराजी व्यक्त केली. मोहटादेवी गड परिसरातील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे आदेश देत वनविभागाला नोटीस बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या. बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढीव टँकरद्वारे पाणीपुरवठा, 24 तास वीज, प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, पाण्याची तपासणी, रुग्णवाहिका व 24 तास बाह्यरुग्ण सेवा, अग्निशमन वाहन, फिरते शौचालय आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले. पाथर्डी आगाराकडून 24 तास जादा बससेवा देण्यात येणार आहे. घटस्थापना व पालखी मिरवणुकीसाठी अतिरिक्त पोलिस, महिला पोलिस, वाहतूक पोलिस, एसआरपीएफ, गृहरक्षक दल व शीघ्रकृती दलाचा बंदोबस्त राहणार आहे. नवरात्र काळात गाभारा दर्शन बंद राहणार असल्याचे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले. विविध रस्त्यांच्या कामांबाबत ‘साहेबांना विचारून सांगतो’ असे उत्तर मिळाल्याने मते यांनी संबंधित प्रतिनिधीची कानउघाडणी केली. मग तुम्ही बैठकीला कशासाठी आला आहात? असा सवाल करत सर्व विभागांनी सकारात्मक भूमिका घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दुकानदार, पार्किंग व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी दुकानदार, पार्किंग व्यावसायिक, शेतकरी व जागामालकांची पोलिस व प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. पार्किंगचे दर, जागेची उपलब्धता तसेच प्रसाद, नारळ व अन्य साहित्य विक्रेत्यांच्या अतिक्रमणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.




