सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – सोशल मिडीयावर अश्लील मजकूर लिहून व व्हायरल करून विनयभंग केल्याची फिर्याद पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याने पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध विनयभंग, आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत घोळवे, अमोल मुळे, गणेश जाधव, दशरथ मपलेकर, आसाराम सणस, मनिष चावरीया अशी गुन्हा केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की इव्हेंट मॅनेजर असे ट्विट केले होते.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अतिशय खालच्या पातळीवर अश्लिल भाषेत मजकूर लिहिला आहे. तसेच त्यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरून अश्लिल टिप्पनी देखील केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले आहे. जेव्हा त्यांना सोशल मीडियावर केलेल्या अश्लिल कमेंटची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी तत्काळ सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.