कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
शहरातील लाईफ केअर हॉस्पिटलसमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव शहरात चोरीच्या घटनेचे सत्र सुरुच आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये जावेद रशिद शेख, रा. हनुमाननगर हे मंगळवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास गेले होते. जावेद शेख यांनी कामाचे पैसे त्यांच्या सहकार्याकडून घेतले.
दोन लाखांची ही रक्कम जावेद शेख यांनी घेतल्यानंतर त्यांची दुचाकी एमएच 17 के 4784 च्या डिक्कीमध्ये ठेवली होती. हॉस्पिटलमधून शेख हे बाहेर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गाडीच्या डिक्कीचे लॉक तुटलेले आहे. त्यांनी तपासणी केली तेव्हा दोन लाख रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जावेद शेख यांनी रक्कम चोरी झाल्याची माहिती तात्काळ शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा ही रक्कम पाळत ठेऊन लंपास केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अज्ञात दोन चोरट्यांविरूद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.