मुंबई | Mumbai
मान्सून काल (4 मे) केरळममध्ये आगमन झाले. भारतीय हवामान खात्याने याबाबतची अधिकृत घोषणा केली की केरळमध्ये मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येणार आहे. मान्सूनच्या आगमनामुळे कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज मान्सून गोव्यात दाखल झाला असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मोसमी वारे राज्यात वेळेत दाखल होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने यंदा २६ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी ४ जून उजाडावा लागला. केरळमधील या विलंबाचा परिणाम महाराष्ट्रातील आगमनावरही झाला आहे. आता राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सॅटेलाईट प्रतिमांमध्ये केरळ किनारपट्टी, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनापट्टीवर शुक्रवारी दाट ढगांची दाटी दिसून येत आहे. त्यामुळे या प्रदेशात मान्सूनचे आगमन केव्हा होते यावर आता हवामान अभ्यासकांसह हवामान विभागाचेही लक्ष आहे. ढगांचा हा पट्टा हळूहळू तळकोकणाच्या दिशेने सरकत आहे. पुढील ४८ तासांत हीच स्थिती कायम राहिली, तर तळकोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी हवामानाची ही स्थिती अनुकूल मानली जाते.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देश आणि राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, जून महिना सुरू झाला तरी पाऊस नसल्याने महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे आता मान्सून कधी सक्रिय होतो आणि पावसाचा जोर कसा राहतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




