Wednesday, September 2, 2026
Homeराजकीयआज निवडणुका झाल्यास NDA ला ‘इतक्या’ जागांचा अंदाज; 'काॅक्रोच'च्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदा?

आज निवडणुका झाल्यास NDA ला ‘इतक्या’ जागांचा अंदाज; ‘काॅक्रोच’च्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदा?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशाच्या राजकारणात कधी काय घडेल आणि हवेची दिशा कधी बदलेल, याचा नेम राहिला नाही. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता थेट राष्ट्रीय राजकारणावर उमटू लागल्याचे चित्र आहे. इंडिया टुडे आणि सी-व्होटर (C-Voter) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या जनमत चाचणीनुसार (Mood of the Nation Survey), या आंदोलनाचा अप्रत्यक्ष फायदा विरोधी पक्षातील मुख्य घटक असलेल्या काँग्रेसला होताना दिसत आहे.

सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, देशात जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा बहुमताचा आकडा गाठताना दिसत आहे. मात्र, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या सर्व्हेमध्ये एनडीएला सहज बहुमतासह ३३५ हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या तब्बल २६ जागा कमी होताना दिसत आहेत. सध्याच्या अंदाजानुसार भाजप आणि सहकाऱ्यांना सुमारे २६१ जागा मिळण्याची शक्यता आहे, जी बहुमताच्या जवळ असली तरी पूर्वीच्या आलेखापेक्षा घसरलेली आहे.

दुसरीकडे, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा मोठा फायदा काँग्रेस पक्षाला मिळताना दिसत आहे. पूर्वीच्या सर्व्हेत काँग्रेसला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज होता. मात्र, नव्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या खात्यात २६ जागांची भर पडत असून हा आकडा १०६ पर्यंत पोहोचला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, सत्ताधारी पक्षाविरोधातील असंतोष आणि आंदोलनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात काँग्रेसला यश येत आहे.

या सर्व्हेमध्ये नव्याने चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबतही जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. जर हा पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला, तर ३३ टक्के मतदारांनी त्यांना मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ४३ टक्के लोकांनी त्यांना मतदान करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २४ टक्के मतदार अजूनही ‘अनिर्णित’ (Undecided) असून, हीच अनिश्चितता आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीचे कारण ठरू शकते.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

  • नरेंद्र मोदी: तब्बल ४९ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना आपली पहिली पसंती दिली आहे.
  • राहुल गांधी: २७ टक्के पसंतीसह काँग्रेस नेते राहुल गांधी दुसऱ्या स्थानावर आहेत.
  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय: या सर्व्हेतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे दाक्षिणात्य राजकारणातील महत्त्वाचे नाव आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर धडक मारली आहे.

एकंदरीत पाहता, जंतरमंतरवरील आंदोलनानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुका अत्यंत रंजक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत या सर्व्हेतून मिळत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...