अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरातील नंदनवन नगर परिसरात मॉर्निंग वॉकवरून परतणार्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे 60 हजार रुपये किमंतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत सिसिलिया सुरेश त्रिभुवन (वय 61, रा. नंदनवन नगर, बंधन लॉनच्या पाठीमागे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (17 जुलै) रात्री 8.15 वाजता, फिर्यादी या त्यांच्या पतींसोबत फिरण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. फिरून घरी परतत असताना जी.एम. कार सजावट दुकानासमोरील रस्ता, बंधन लॉनजवळ, नंदनवन नगर येथे भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने ओढून तोडले आणि क्षणार्धात घटनास्थळावरून राजवीर चौकाच्या दिशेने पळ काढला.
घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून फरार झाले होते. चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे 60 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.




