घारगाव |वार्ताहर| Ghargav
तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत शेतकर्यांच्या विद्युत पंपांची चोरी करणारे 3 आरोपींची टोळी घारगाव पोलिसांनी जेरबंद करत 1060 फुटाची केबल, 15 पंप, एलईडी टीव्ही आणि ट्रॅक्टरची बॅटरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की 16 फेब्रुवारी, 2026 रोजी महेश गणपत हांडे (वय 33, रा. भोजदरी, ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलीस ठाणे येथे त्यांच्या शेतातील मोटार पंप व त्याची कॉपरची केबल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रिक तपासावरुन हा गुन्हा किशोर सुरेश काळे (वय 25), सागर सुरेश काळे (वय 23), अनिल देमाभाऊ काळे (वय 27, सर्व रा. बाळंद्री, ता. संगमनेर) यांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना पथकातील पोहेकॉ. बी. वाय. गोडे, पोकॉ. प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, रोहिदास आंधळे, चालक चंद्रकांत मेढे आणि श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ. सचिन धनाड यांनी ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी चोर्या केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन दाखल गुन्ह्यांतील 1060 फुटांची कॉपर केबल, पंधरा पंप, एलईडी टीव्ही, ट्रॅक्टरची बॅटरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून, यापुढेही चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.





