अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुकारलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी (13 जुलै) प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलन उधळून लावले. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात स्थानबध्द करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खा. वाकचौरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात केली होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार वाकचौरे यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलन छेडण्याचा ठाकरे गटाचा निर्धार होता.
दरम्यान, या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनाला आधीच मिळाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तोफखाना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. खा. वाकचौरे यांच्या आगमनापूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख जाधव यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेऊन काही काळ स्थानबध्द करण्यात आले. दिशा समितीची बैठक संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ताब्यात घेण्यापूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.




