मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसेंच्या निवासस्थानी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यानंतर आता वाकचौरे यांनी शिंदेंच्या नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.
भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत. शिर्डीतील एमआयडीसीच्या कामानिमित्ताने ते उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचं सांगिततलं जातंय. मात्र, समन्वय समितीची बैठक उशिरा सुरू राहणार असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेट न घेता माघारी परतावं लागलं.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे गटातील काही खासदार प्रवेश करणार असल्याचे दावे शिंदे गटातील नेत्यांकडून वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक भेटीला आता विशेष राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे.
तिसर्या खासदाराची भेट
यापूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटी विकासकामे आणि निधी यांसंदर्भात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आलं असलं, तरी त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा कायम आहे.
एमआयडीसीच्या कामासाठी भेट, पण राजकीय चर्चांना उधाण
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कार्यकर्त्यांकडूनही ही भेट पूर्णपणे शिर्डीतील एमआयडीसीच्या कामांशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे केवळ विकासकामांच्या चौकटीत न पाहता संभाव्य राजकीय हालचालींच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे.
ठाकरेसेनेतील हालचालींकडे सर्वांचे लक्ष
ठाकरेसेनेतील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीतील राजकारणावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




