नाशिक | Nashik
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाच्या (Rain) सततच्या सरींमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, रामकुंड परिसरात (Ramkund Area) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गोदाघाटावरील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून, परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली
दुसरीकडे या सततच्या पावसामुळे गंगापूर धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून,खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजेपासून विसर्ग ६,३५४ क्यूसेक्सवरून ७,४१३ क्यूसेक्स करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी एक वाजता हा विसर्ग १२, ६०० इतका करण्यात आला असून, गोदावरी नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना आणि प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Trimbakeshwar Rain News : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्यासह पाऊस; घराचे पत्रे उडून तीन भाविक जखमी, एक गंभीर
दुपारी तीन वाजेनंतर धोकादायक परिस्थितीची शक्यता
नाशिक शहरासह धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि विभागप्रमुखांना तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत. आज (गुरुवारी) दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सतर्कता बाळगण्याचे, तर पाऊस कायम राहिल्यास दुपारी ३ नंतर परिस्थिती ‘डेंजर झोन’ म्हणून घोषित होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या व सखल भागांमध्ये अधिकारी स्वतः पाहणी करून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यासाठी बांधकाम, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि विभागीय कार्यालयांनी समन्वयाने मदतकार्य राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व संसाधने सुस्थितीत असल्याची खात्री करून त्याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे तातडीने सादर करण्याचे निर्देशही आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रामकुंड, सराफ बाजारासह नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका, नगरपालिका, रामकुंड, सराफ बाजार, भांडी बाजार आणि नदीकाठच्या ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.




