शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय आखाडा चांगलाच पेटला असून ठाकरे गटाने आता थेट फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात घुसून आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिर्डी येथील सिद्ध संकल्प कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खा. संजय राऊत यांनी शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि तिखट शब्दांत घणाघाती हल्ला चढवला. या गद्दार खासदाराचे काही करू नका, रस्त्यात दिसला की ऑपरेशन तुडवा करा, असे थेट आणि आक्रमक आदेश राऊतांनी शिवसैनिकांना दिले.
खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी राजकीय आयुष्यात दुसर्यांदा बंडखोरी केल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या निष्ठावंतांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. याच मुद्याचा धागा पकडत संजय राऊत यांनी वाकचौरेंच्या पक्षबदलाचा पाढा वाचला. ते म्हणाले, या ठिकाणचा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. याने पूर्वी एकदा गद्दारी केली होती, त्यानंतर पुन्हा नाक घासून, माफी मागत मातोश्रीवर आला आणि शिवसैनिकांच्या बळावर खासदार झाला. मात्र हा माणूस पुन्हा 100 कोटी रुपयांना विकला गेला आहे.
यावेळी राऊतांनी एक अत्यंत खळबळजनक प्रसंग जाहीरपणे सांगितला. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेबांना बोलावून विचारले होते, भाऊसाहेब, तुमच्याबद्दल बाजारात काहीतरी वेगळे ऐकायला येतंय, काय भानगड आहे? त्यावर या माणसाने चक्क तीन वेळेस साईबाबांची खोटी शपथ घेतली होती. मी पक्ष सोडणार नाही. स्वतःचा एक रुपया खर्च न करता हा माणूस खासदार झाला, कारण निवडणुकीतील सर्व पैसे पक्षाने दिले आणि घाम शिवसैनिकांनी गाळला. अशा माणसाने साईंच्या भूमीत गद्दारी केली आहे, असा संताप राऊतांनी व्यक्त केला. स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे कौतुक करताना संजय राऊत यांनी विरोधकांना कडक इशारा दिला. वाकचौरे सारखे स्वार्थी लोक पक्षात येतील आणि जातील, पण शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्ताने उभी आहे, ती अशीच ताठ मानेने उभी राहील. महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरे यांनी आता वैयक्तिक दौरा सुरू केला असून ते मैदानात उतरल्याने संपूर्ण राज्यात मोठे राजकीय तुफान आले आहे. हे गद्दार आता या तुफानात पालापाचोळ्यासारखे वाहून जातील.
वाकचौरेला आता उघड्या डोळ्यांनी सांगा, तुला पुन्हा लोकसभेचे तोंड दिसणार नाही, अशा कडक शब्दांत राऊतांनी विंगबाण चालवले. शिर्डीच्या एका मुस्लिम मावळ्याचे उदाहरण देत राऊत म्हणाले, येथील एका मुस्लिम कार्यकर्त्याने शेवटपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असा जाहीर बोर्ड लावला आहे. ही केवळ त्याची वैयक्तिक भावना नसून संपूर्ण महाराष्ट्राची जनभावना आहे. आम्ही साईबाबांच्या दरबारात आलो आहोत आणि इथे न्यायाचाच विजय होईल. या मेळाव्याला शिर्डी आणि जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.




