Sunday, July 21, 2024
Homeनगररोहित पवार 2019 निवडणुकीत भाजपकडून लढण्यास इच्छुक होते

रोहित पवार 2019 निवडणुकीत भाजपकडून लढण्यास इच्छुक होते

प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे || नगर दक्षिणेतील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामगिरीवर नाखूष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

यंदा लोकसभा निवडणूक विकासापासून दूर नेत वेगळ्याच मुद्द्यावर लढण्यात आली. मात्र, प्रत्येकवेळी अशीच परिस्थिती राहील असे नाही. सहानभूती एकदाच मिळते आणि निष्ठेची भाषा कोणी करू नये. 2019 च्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील एका आमदाराने तिकीट न मिळाल्याने त्यावेळी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यानंतर सत्तेत सहभागी न केल्याने पक्षाचा राजीनामा देण्याचीही तयारी केली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता केला.

यावेळी त्यांनी नगर दक्षिणेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संघटनात्मक कामावर नाराजी व्यक्त करत भान राखून, ध्येय ठेवून पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकार्‍यांनी काम करावे, या शब्दांत सर्वांचे कान उपटले. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत खा. तटकरे मंगळवारी बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्यावतीने राज्यभर आढावा बैठकांचे नियोजन आहे. या बैठकांची सुरूवात नगर जिल्ह्यातून सुरू करण्यात आली. नगरमधील एका मंगल कार्यालयात आयोजित बैठकीला आ. संग्राम जगताप, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, दत्ता पानसरे, नगर शहराचे शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते, अभिजित खोसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खा. तटकरे म्हणाले, नगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. यामुळे या जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाला राष्ट्रवादीने सुरूवात केली असून येत्या निवडणुकीत अजित पवार हे महायुतीमध्ये ऐतिहासीक कामगिरी करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती अल्पसंख्याक समाजाला विश्वास देण्यात कमी पडल्याची कबुली देत प्रत्येक निवडणुकीत वेगळी परिस्थिती असते आणि ती वेगवेगळ्या मुद्यावर लढली जाते. राष्ट्रवादीचा आमदार असणार्‍या नगर शहराने महायुतीच्या उमेदवाराला 31 हजारांचे मताधिक्य दिले. याबद्दल आ. संग्राम जगताप यांचे अभिनंदन. मात्र, यामुळे गाफील राहू नका, असा सल्लाही तटकरे यांनी दिला.

नगर दक्षिणेतील संघटनात्मक पातळीवरील कामावर तटकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच येणार्‍या विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढणार असून अधिकाअधिक जागा राष्ट्रवादीला कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. युवकचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्ष संघटना मजबूत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नीलेश लंके, आ. रोहित पवार, आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच अजित पवार हे शत्रुला दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचे सांगितले.

जेव्हा तटकरे चिडतात
खा. तटकरे यांचे भाषण सुरू असताना व्यासपिठावर एका कार्यकर्ता आ. जगताप यांच्या कानात काही सांगण्यासाठी पोहचला. यावेळी कार्यकर्ता आणि आ. जगताप यांच्यात चर्चा सुरू असल्यामुळे भाषण करणारे खा. तटकरे चांगलेच संतापले. त्यांनी प्रत्येकाने पक्ष शिस्त पाळली पाहिजे, असे सांगत आ. जगताप आणि संबंधिताला जरा वेळ खाली बसा. आपण नंतर बोलू, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.

2024 राष्ट्रवादीचा वरचष्मा – आ. जगताप
मागील निवडणुकीत काय झाले, हे पाहण्यापेक्षा येणार्‍या निवडणुका कशा लढल्या गेल्या पाहिजे हे पाहणे गरजेचे असल्याचे आ. जगताप म्हणाले. राज्यातील युतीच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्याने युती ही महायुती झाल्याचे सांगत नगर शहरात नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी 84 कोटी आणि शहरातील सर्व डिपी रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी अजितदादा यांनी दिला असल्याचे सांगत नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मतदारांना याची जाणीव करून द्यावी. नगर जिल्ह्यात 2024 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असणार असल्याचा विश्वास आ. जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या