अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बोल्हेगाव गावठाण येथे विटभट्टीवर चिखल करीत असताना चिखल मिक्सर मशिनमध्ये साडीचा पदर अडकून एक महिला गंभीर जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना 19 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. चौकशीअंती 30 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
विजया अमोल गाडे (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर, मूळ रा. निंबोडी, ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत पती अमोल मच्छिंद्र गाडे यांनी पोलिसांत फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक तेजस बाबासाहेब आंबेकर (रा. विळद, ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
बोल्हेगाव येथील बाळासाहेब वाकळे यांच्या वीटभट्टीवर गाडे दाम्पत्य विटा थापण्यासाठी चिखल तयार करीत होते. मिक्सर मशिनला ट्रॅक्टर जोडून चिखल तयार करण्याचे काम सुरू होते. 19 डिसेंबरमध्ये सकाळी मिक्सरमध्ये चिखल शिल्लक आहे का हे पाहण्यासाठी विजया गाडे मिक्सरवर चढल्या. यावेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या फिरत्या रॉडमध्ये साडीचा पदर गुंतून मिक्सरमध्ये जोरात ओढल्याने त्याच्या हाताला, पायाला व अंगाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकस्मात मृत्यूच्या चौकशीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.