मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यातील १२ हजार ४१५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याविरोधात प्रशासकीय कार्यवाही करून रक्कम वसूल करण्याबाबत संबंधित विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तर दिली आहे.
अनेक पात्र, गरीब आणि गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेतून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने अपात्र ठरवले आहे. मात्र, शासकीय महिला कर्मचाऱ्यांसह पुरुष आणि अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या अपात्र व्यक्तींनी खोटी माहिती देऊन १६५ कोटी रुपयांचा लाभ घेऊन शासकीय निधीचा अपहार केला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार विलास तरे यांनी प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात तटकरे यांनी १२ हजारांहून अधिक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची कबुली दिली आहे. ई-केवायसी न केल्याने अडीच लाखांच्या उत्पन्नाखालील पात्र महिला लाभार्थ्यांचा लाभ थांबविण्यात आला आल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
सदर पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी १८ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर २०२५ असा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतरही अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्याने राज्य सरकारने त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र, लाभार्थ्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा लाभ बंद करण्यात आल्याचे तटकरे यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.




