Saturday, September 5, 2026
HomeनगरRahuri : मुळा धरणाचा साठा ऐंशी टक्क्यांच्या पार

Rahuri : मुळा धरणाचा साठा ऐंशी टक्क्यांच्या पार

आवक कायम राहिल्यास विसर्गाची शक्यता || शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे अवघ्या चार दिवसांत मुळा धरणाने टक्क्यांची पंचाहत्तरी पार केली असून, सध्या धरणात 81.71 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील 7 दिवसांत धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 21 हजार 247 दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणात 5 हजार 990 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, हीच आवक कायम राहिल्यास धरण परिचालन सूचीनुसार येत्या सुमारे सात दिवसांत नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ येऊ शकते. दरवर्षी 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत धरणातील जलसाठा 22 हजार 800 दशलक्ष घनफूट (87.69 टक्के) झाल्यानंतर विसर्गाचे नियोजन केले जाते.

मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तब्बल 83 हजार 223 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. यामध्ये उजवा कालवा 69 हजार 534 हेक्टर, डावा कालवा 10 हजार 121 हेक्टर आणि वांबोरी चारीद्वारे 3 हजार 568 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे धरणातील प्रत्येक वाढता टीएमसी जलसाठा शेतकर्‍यांच्या अपेक्षांना नवे बळ देत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी किती सिंचन आवर्तने द्यावीत, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे धरण भरल्यानंतर सिंचन नियोजनालाही वेग येणार असून, यंदा अतिरिक्त आवर्तन मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात आशावादाचे वातावरण आहे.

मुळा धरण 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेपर्यंत भरल्यास केवळ सिंचनालाच नव्हे, तर विविध पाणीपुरवठा योजनांद्वारे लाखो नागरिकांनाही मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदाचा उर्वरित पावसाळा आणि धरणातील वाढता जलसाठा याकडे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे. मान्सूनच्या सुरुवातीला अपुर्‍या पावसामुळे धरणातील जलसाठ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे नियोजनही धोक्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे चित्र पूर्णपणे बदलले आहे. वाढता जलसाठा पाहून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, धरण लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने भरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नियोजित कालावधीत विसर्गाची शक्यता
मुळा धरणाचा जलसाठा सातत्याने वाढत आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास नियोजित कालावधीत नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ येऊ शकते. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार सिंचन आवर्तनांचे नियोजन केले जाईल. यंदा धरण पूर्ण भरल्यास सिंचनासह विविध पाणीपुरवठा योजनांनाही मोठा दिलासा मिळेल.
राजेंद्र पारखे, शाखा अभियंता, मुळा धरण.

कुकडीत 85 टक्के पाणी

डिंभे, येडगाव, वडज, चिल्हेवाडीतून विसर्ग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाणलोटात गत आठ दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहचला आहे. जूनमध्ये या प्रकल्पात केवळ 4 टक्के पाणीसाठा होता. गत 15 दिवसांत तब्बल 80 टक्क्यांहून अधिक पाणी जमा झाले.

उपयुक्त पाणीसाठा काल 25148 दलघफू (85 टक्के) झाला. गतवर्षी केवळ 20354 दलघफू (68 टक्के) पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुुलनेत यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. पाण्याची आवक होत असल्यानेच डिंभेतून 14805 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. येडगाव विसर्ग 4500 क्युसेक, वडज 10 हजार क्युसेक, चिल्हेवाडीतून 4200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, कुकडी प्रकल्पातील पाण्याचा दक्षिण नगर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लाभ होतो. गत 20 दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा खपाटीला गेल्याने चिंतेचे वातावरण होते. पण स्थिती बदलली आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...