राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या मुळा उजवा कालव्यात (Mula Right Canal) महात्मा फुले विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील पाच विद्यार्थी पोहण्यासाठी (Student Swim) गेले असता या पैकी राहुरी शहरातील इयत्ता 10 वीतील विद्यार्थी संकेत श्रीपती तरटे (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हा बुडून (Drowning) मरण पावल्याची घटना बुधवार दि. 8 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती अशी, राहुरीच्या महात्मा फुले विद्यापीठातील (Mahatma Phule University Rahuri) सावित्रीबाई फुले विद्यालयाती पाच विद्यार्थी राहुरी विद्यापीठ परिसरातील गावडे वस्ती शेजारून जाण्यार्या मुळा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. कालव्यात पोहत असताना दोघे जण बुडायला लागल्याने आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी कालव्याकडे धाव घेतली. पाण्यात उड्या मारून बुडत असलेले चार विद्यार्थी कालव्या बाहेर काढले. मात्र संकेत श्रीपती तरटे हा विद्यार्थी कालव्यात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच विद्यापीठातील सुरक्षा कर्मचार्यांनी कालव्याकडे धाव घेऊन बेपत्ता संकेत तरटे या विद्यार्थ्याची शोधाशोध सुरू केली. कालव्यात (Canal) पाणी जास्त असल्याने कालव्याचे पाणी कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला कळविले. पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन कालव्यातील विसर्ग कमी करण्याच्या सुचना देऊन पाणी कमी केले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत संकेत याचा शोध सुरू होता. काल दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान संकेतचा मृतदेह (Dead Body) त्याच ठिकाणी मिळून आला. संकेत हा राहुरी विद्यापीठातील भाजीपाला विभागामध्ये कार्यरत असलेले श्रीपती तरटे यांचा धाकटा मुलगा आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून काल दुपारी संकेतवर राहुरी (Rahuri) येथे मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.