Monday, September 16, 2024
Homeनगरमुळातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर

मुळातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर

निळवंडे निम्मे होणार, मुळा नदीचा विसर्ग 10545 क्युसेक || घाटमाथ्यावर पावसाचे पुनरागमन

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

भंडारदरा आणि मुळा पाणलोटात शुक्रवारी, शनिवारी पावसाची उघडझाप होती. पण काल रविवारी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. भंडारदरात काल दिवसभरात 132 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. तर हरिश्चंद्र गड येथे पावसाचा जोर काहीसा वाढल्याने नदीतील पाणी तासागणिक वाढत आहे. पाण्याची आवक पाहता आज मुळातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर जाणार आहे.

भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, पांजरे, रतनवाडीत गुरूवारी अतिसृष्टी झाल्याने हा भाग गारठून गेला असून जनजीवन विस्कळीत झाले होते. धरणातही प्रचंड आवक झाली. पण त्यानंतर अचानक पावसाचा जोर कमी झाला आणि धरणातील आवकही मंदावली. मुळा पाणलोटातही संततधार सुरू होती. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 29 हजार क्युसेकच्या पुढे गेला होता. पण येथेही नंतर पाऊस कमी झाल्याने 6 हजाराच्या खाली विसर्ग आला होता. पण रविवारी पुन्हा दोन्ही धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आज सोमवारी दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक वाढणार आहे.

काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 339 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने 105 दलघफू पाण्याचा वापर झाला. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 9229 दलघफू (83.60 टक्के) साठा झाला होता. काल दिवसभर भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 6 मिमी झाली आहे.
निळवंडे धरणातही पाण्याची आवक हळूवार होत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 3825 दलघफू ((45.93टक्के) होता. सायंकाळी हा पाणीसाठा 3903दलघफू (46.87टक्के) झाला होता आज अथवा उद्या या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर जाणार आहे. आढळा धरणातील पाणीसाठा 86.60 टक्के झाला आहे.

हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित भागात काल पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीतील पाणी वाढत आहे. सकाळी 6 वाजता कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 5990 क्युसेक होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 7310 क्युसेकपर्यंत वाढला. दुपारनंतरही आषाढ सरी जोरदार बरसत असल्याने सायंकाळी या नदीचा विसर्ग 10342 क्युसेक झाला होता. त्यामुळे सायंकाळी ही नदी पुन्हा दुथडी वाहत होती. त्यामुळे मुळा धरणाकडे पाण्याची जोमाने आवक होत आहे. काल सायंकाळी मुळा धरणातील पाणीसाठा 15095 दलघफू झाला होता. आज सोमवारी या धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर जाणार आहे.

घाटमाथ्यावर पावसाचे पुनरागमन

गोदावरीचा विसर्ग 3559 क्युसेकवर, दारणा 2624 क्युसेकवर स्थिर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

परवा मंदावलेला पाऊस काल पुन्हा सक्रिय झाला. यामुळे पाण्याची आवक काहिशी वाढल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग 3155 क्युसेकवरुन 404 क्युसेक वाढवून 3559 क्युसेक इतका करण्यात आला आहे. दारणातून 2624 क्युसेक, भाम मधून 1790 क्युसेक, भावलीतून 290 क्युसेक, तर कडवातून 400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

शनिवारी दिवसभर धरणांच्या पाणलोटात पावसाचा मागमूस नव्हता. सायंकाळनंतर मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली. कालही रविवारी दिवसभर अधूनमधून पावसाची मध्यम स्वरुपाची रिपरिप सुरु होती. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे काल दारणात भावलीच्या विसर्गासह 227 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणातून 2624 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. या धरणातील 83.44 टक्के पाणी साठा स्थिर ठेवून नवीन येणार्‍या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणातून काल सकाळ पर्यंत 1.8 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 100 टक्के भरलेल्या भावलीच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.

भावलीच्या सांडव्यावरुन 290 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भाम धरण 100 टक्के भरलेले आहे. या धरणातून सकाळी 6 वाजता 1790 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने सुरु होता. कडवा 89.40 टक्के, मुकणे धरणात 32.77 टक्के, वाकीत 41.85 टक्के, वालदेवी 66.37 टक्के असे साठे आहेत. गंगापूर धरण परिसरातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन झाले. गंगापूर धरण 58.54 टक्के भरले आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 3296 दलघफू साठा आहे. कश्यपी 29.05 टक्के, गौतमी गोदावरी 55.94 टक्के, आळंदी 24.51 टक्के असे साठे आहेत. वरील धरणांचे विसर्ग खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 3155 क्युसेकने विसर्ग सुरु होता. काल दूपारी 3 वाजता हा विसर्ग 404 क्युसेक ने वाढवत तो 3559 क्युसेक इतका करण्यात आला. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासुन गोदावरी नदीत या बंधार्‍यातुन 2.6 टीएमसी चा विसर्ग करण्यात आला.

जायकवाडीत आवक सुरुच
काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार जायकवाडी जलाशयात 6.65 टक्के उपयुक्तसाठा तयार झाला आहे. काल 6977 क्युसेकने आवक सुरु होती. 5 टीएमसी उपयुक्तसाठा तयार झाला आहे. तर मृतसह एकूण साठा 31.1 टीएमसी इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या