Monday, October 19, 2026
Homeक्राईमAhilyanagar : कमिशनच्या लालसेतून तुरूंगाची वाट

Ahilyanagar : कमिशनच्या लालसेतून तुरूंगाची वाट

म्युल खात्यांचा सायबर गुन्ह्यांत वाढता वापर

अहिल्यानगर |सचिन दसपुते | Ahilyanagar

डिजिटल व्यवहारांची झपाट्याने वाढ, ऑनलाइन बँकिंगचा प्रसार आणि आर्थिक व्यवहारांची सुलभता यामुळे एकीकडे सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ झाले आहे; परंतु दुसरीकडे सायबर गुन्हेगारांसाठीही नवे मार्ग खुले झाले आहेत. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये ‘म्युल खाते’ (इतरांच्या पैशांचे संशयास्पद व्यवहार करण्यासाठी वापरलेले खाते) या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेषतः फारसे वापरात नसलेली चालू खाती, व्यावसायिक खाती किंवा सामाजिक संस्थांची (एनजीओ) खाती यांचा गैरवापर करून गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करत आहेत.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व नेवासा तालुक्यातील काही तरूणांना ‘म्युल खाते’ प्रकरणात अटक करण्यात आली होती. जिल्ह्यातील डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट किंवा इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मणिपूर, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी राज्यांतील व्यक्तींची तसेच एनजीओंची खाती वापरली गेल्याचे येथील सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. फसवणुकीची रक्कम म्युल खात्यात जमा करून काही मिनिटांत ती रोख स्वरूपात काढली जाते आणि हवाला, यूएसडीटी, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून चीन, कंबोडिया यांसारख्या देशांत पाठवली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कमिशनच्या मोबदल्यात आपली बँक खाती सायबर गुन्हेगारांना वापरायला दिल्याने अनेकांना तुरूंगवास भोगावा लागत आहे.

एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झाल्यास आणि संबंधित व्यक्तीने तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केल्यास फसवणुकीचा पैसा कोणकोणत्या बँक खात्यांमध्ये गेला आहे हे शोधता येते. त्यानंतर संबंधित बँक खाती गोठवली जातात. फसवणूक करण्यापूर्वीच गुन्हेगारांकडून पैसे कोणत्या खात्यावर पाठवायचे याचा सविस्तर आराखडा तयार केलेला असतो. सायबर गुन्हेगार प्रथम अशा व्यक्तींचा शोध घेतात ज्यांची खाती निष्क्रिय किंवा कमी वापरात असतात. यामध्ये लहान व्यावसायिक, नव्याने सुरू झालेल्या संस्था, एनजीओ किंवा आर्थिक अडचणीत असलेले नागरिक यांचा समावेश होतो. मध्यस्थांच्या माध्यमातून अशा व्यक्तींशी संपर्क साधला जातो. शेअर मार्केटमधून मोठी रक्कम येणार आहे, राजकीय निधी किंवा एखाद्या प्रकल्पाचे पैसे येणार आहेत, अशी विविध कारणे सांगून खाते वापरण्याची परवानगी मागितली जाते. त्याबदल्यात संबंधित खातेधारकांना 1 ते 10 टक्क्यांपर्यंत कमिशन देण्याचे आश्वासन दिले जाते. अनेकदा हे व्यवहार कायदेशीर असल्याचा आभास निर्माण केला जातो.

मध्यस्थांमार्फत बँक खातेधारकांकडून बँकेला लिंक असलेले मोबाईल नंबरचे सिमकार्ड, चेकबुक, एटीएम कार्ड, पासबुक ताब्यात घेतले जाते. संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावले जाते. तेथे भेटणारी व्यक्ती मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकून ‘एपीके’ फाईल डाउनलोड करते आणि संबंधित बँक खात्याची सर्व माहिती मिळवते. त्यानंतर खात्याचे व्यवहार मर्यादा (लिमिट) वाढवली जाते तसेच इतर बँक खाती जोडली जातात. खातेधारकाला सुरूवातीला हे सोपे उत्पन्न वाटते; परंतु प्रत्यक्षात या खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम ही ऑनलाइन फसवणुकीतून आलेली असते. पुढे ही रक्कम विविध खात्यांमध्ये फिरवून तिचा मागोवा घेणे कठीण केले जाते.

सायबर पोलीस तपास करताना पैशांचा मागोवा घेतल्यावर सर्वप्रथम संबंधित खातेधारकच समोर येतो. परिणामी, खाते गोठवले जाते, खातेधारकावर गुन्हा दाखल होतो आणि त्याला अटकही केली जाते. कायद्याच्या दृष्टीने आपल्या बँक खात्याचा गैरवापर होऊ देणे ही गंभीर बाब मानली जाते. ‘मला माहिती नव्हते’ हा बचाव बहुतांश वेळा ग्राह्य धरला जात नाही. खातेधारकाने आपल्या खात्यातील सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे ही त्याची जबाबदारी मानली जाते.

म्युल खाते म्हणजे काय ?
म्युल खाते म्हणजे असे बँक खाते, जे मूळ मालकाच्या नावावर असते; मात्र त्याचा वापर तृतीय व्यक्ती करते. बहुतेक वेळा सायबर गुन्हेगार अशा खात्यांचा वापर करतात. खातेधारकाला काही प्रमाणात कमिशन देण्याचे आश्वासन देऊन हे खाते तात्पुरते भाड्याने घेतले जाते. या खात्यांमधून फसवणुकीची रक्कम जमा करणे, वळवणे आणि काढणे असे व्यवहार केले जातात.

बँकांची भूमिका संशयास्पद
फारसे वापरात नसलेली चालू खाती, व्यावसायिक खाती किंवा सामाजिक संस्थांची (एनजीओ) खाती यांची माहिती बँकेतील काही कर्मचार्‍यांमार्फत सायबर गुन्हेगारांकडे पोहोचत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेतून माहिती गेल्यानंतरच सायबर गुन्हेगार संबंधित खातेधारकांशी संपर्क साधत असल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. यामागे बँकांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते.

काय काळजी घ्यावी ?
आपले बँक खाते कोणालाही वापरासाठी देऊ नका, अनोळखी व्यक्तीकडून मिळणार्‍या कमिशनच्या ऑफर टाळा, निष्क्रिय खाती बंद करा किंवा त्यांची नियमित तपासणी करा, एनजीओ किंवा व्यावसायिक खात्यांमध्ये पारदर्शक व्यवहार ठेवा, संशयास्पद व्यवहार त्वरित सायबर पोलिसांना कळवा, डिजिटल साक्षरता वाढवा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...