Friday, November 13, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai AC Local : लोकलचा एसी बंद पडल्याने दोन प्रवासी बेशुद्ध; मध्य...

Mumbai AC Local : लोकलचा एसी बंद पडल्याने दोन प्रवासी बेशुद्ध; मध्य रेल्वेच्या कारभारावर संताप

मुंबई । Mumbai

सकाळची वेळ… कामावर जाण्याची घाई… आणि मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये झालेली तुडुंब गर्दी. अशा गर्दीच्या आणि तणावाच्या वातावरणात जर प्रवाशांना वाहून नेणारी वातानुकूलित (एसी) यंत्रणाच अचानक ठप्प झाली, तर काय होईल? याची एक भयानक प्रचिती आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मुलूंड रेल्वे स्थानकात एका एसी लोकलमध्ये भीषण तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही लोकल टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने निघाली होती. सोमवारच्या सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणेच नोकरदारांची लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. लोकल मुलूंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली असताना अचानक गाडीतील वातानुकूलन (AC) यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. एसी लोकलचे सर्व दरवाजे स्वयंचलित आणि हवाबंद असल्याने, बाहेरची हवा आत येण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही. अवघ्या १० मिनिटांतच डब्यातील तापमान कमालीचे वाढले आणि डब्याला एका बंदिस्त खोलीचे स्वरूप आले.

डब्यातील प्रचंड गर्दी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. हवा नसल्याने प्रवाशांचा जीव गुदमरू लागला. या कोंदट वातावरणामुळे डब्यातील एका महिला प्रवाशाला आणि एका पुरुष प्रवाशाला चक्कर आली व ते जागेवरच बेशुद्ध पडले. यामुळे संपूर्ण डब्यात आणि स्थानकावर एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

त्याच डब्यातील सहप्रवाशांनी तातडीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी त्या बेशुद्ध महिलेला कसंबसं डब्यातून बाहेर काढून प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसवले आणि प्रथमोपचार देत शुद्धीवर आणले. मात्र, फहिम अन्सारी या दुसऱ्या प्रवाशाची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण गोंधळानंतर ही बिघाड झालेली लोकल कशीबशी कुर्ला स्थानकापर्यंत आणण्यात आली, मात्र परिस्थिती पाहता रेल्वे प्रशासनाने ही लोकल कुर्ला स्थानकातच रद्द करण्याचा निर्णय घेतला. अचानक ट्रेन रद्द झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची कुर्ला स्थानकावर प्रचंड गर्दी झाली. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बिघाड झालेली ही एसी लोकल आता दुरुस्तीसाठी तातडीने रेल्वे कार्यशाळेत (वर्कशॉप) पाठवण्यात येणार आहे. तसेच, या लोकलच्या पुढील नियोजित दोन फेऱ्या रद्द न करता, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्या ‘नॉन-एसी’ (सामान्य) लोकल म्हणून चालवल्या जाणार आहेत. महागाडे तिकीट काढूनही प्रवाशांच्या जिवाशी खेळ होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे आता मुंबईकरांमधून मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : शिर्डीला गर्दी पेलवते; त्र्यंबकलाच का गडबड होते?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि कोटी कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण,...