मुंबई । Mumbai
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारु शकणार नाही.
आरबीआयने आदेशात सांगितलं आहे की, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यवहार समाप्तीपासून बँक आरबीआयच्या लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतंही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा ते वाढवणार नाही. तसंच कोणतीही गुंतवणूक, निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही. त्यासह कोणतंही पेमेंट वितरित करणार नाही किंवा वितरित करण्यास सहमती देणार नाही. तसंच कोणतीही तडजोड किंवा व्यवस्था केली जाणार नाही. याशिवाय कोणत्याही मालमत्तेची किंवा मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावणार नाही.
बँकेची सध्याची रोखेची स्थिती लक्षात घेता, बँकेला निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये. परंतु आरबीआय निर्देशांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून ठेवींवर कर्ज फेडण्याची परवानगी आहे. बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे, वीज बिल इत्यादी काही आवश्यक बाबींसाठी खर्च करावा लागू शकतो, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातल्याने लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अंधेरीतल्या विजयानगर शाखेसमोर बँकेच्या खातेधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बँकेतून पैसे काढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. रांगेत उभा असलेला प्रत्येक व्यक्ती बँकेत जमा असलेल्या पैशां पैशांबद्दल चिंतेत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, ठेवीदार या बँकेतून फक्त ५ लाख रुपये काढू शकतात. याशिवाय ग्राहकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. सध्या बँकेकडून केवळ लॉकरचे टोकन दिले जात असून ते देखील सर्वांना दिले नसल्याची ठेवीदारांची तक्रार आहे.