मुंबई | Mumbai
मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (२३ जून) रात्री १० च्या सुमारास सदर घटना घडली. अंधेरी ते बोरिवली दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून ही थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावासामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, डब्यातील एका प्रवाशांनी मिळून आरोपीला मारहाण केली. या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या आरोपीने रागाच्या भरात आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि मयांक लोहार नावाच्या प्रवाशावर सपासप वार केले ज्यात मयंक लोहार याचा मृत्यू झाला.
प्रथम श्रेणीच्या डब्यात ही घटना घडल्याची पोलिसांनी माहिती दिली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर बोरिवली स्टेशनवर ट्रेन थांबण्यापूर्वीच उतरुन पसार झाला. घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आरोपी मयंक लोहार रक्ताच्या थारोळ्यात लोकलच्या डब्यात पडलेला दिसून येत आहे आणि आरोपी आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. याचवेळी लोकल डब्यातील इतर प्रवासी घाबरलेले दिसत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. त्यामुळे आरोपीचा माग काढण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यासाठी रेल्वे पोलिसांची 6 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पश्चिम रेल्वे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई लोकलच्या मालाड स्थानकावर 24 जानेवारी 2026 रोजी एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी 27 वर्षीय ओंकार शिंदे याला अटक करण्यात आली होती. मात्र आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




