Saturday, July 25, 2026
Homeराजकीयरितू तावडे सुषमा अंधारे अन् किशोरी पेडणेकरांवर चांगल्याच भडकल्या; म्हणाल्या, "मी रिल...

रितू तावडे सुषमा अंधारे अन् किशोरी पेडणेकरांवर चांगल्याच भडकल्या; म्हणाल्या, “मी रिल स्टार की रिअलस्टार आहे, हे…”

मुंबई । Mumbai

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. मात्र, याच पावसाने मुंबईकरांच्या मान्सूनपूर्व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. कुर्ला (पश्चिम) परिसरातील नौपाडा येथे झाडाची मोठी फांदी कोसळून ६३ वर्षीय युसुफ कुंदावाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, कुर्ल्यात घडलेल्या या दुसऱ्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय तयारीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर बराच वेळ महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने स्थानिक नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू करत पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या संतापजनक परिस्थितीनंतर माजी महापौर आणि शिवसेना (उबाठा) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

या दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर म्हणाल्या, “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून प्रशासनाला पाठीशी घालण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या झाडाबाबत आधीच पत्र दिले होते, तरीही प्रशासनाने त्यावर तात्काळ पावले का उचलली नाहीत, हा चौकशीचा भाग आहे आणि दोषींवर कारवाई होईल.”

विरोधकांवर कडाडून टीका करताना महापौर पुढे म्हणाल्या, “सत्ताधारी कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा खोटा आव आणून विरोधक मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत. आम्ही स्वतः जमिनीवर उतरून २४ तास काम करत आहोत. अशा दुर्घटनांवरून उबाठा आणि मनसे अतिशय गलिच्छ राजकारण खेळत असून मी त्याचा तीव्र निषेध करते. मुंबईत आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. झाडे, मॅनहोल्स आणि आतील जाळ्यांचे ऑडिट झालेच पाहिजे, यात दुमत नाही, पण दुर्घटनेवर राजकारण करून काहीही साध्य होणार नाही.”

किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर थेट हल्ला चढवत महापौरांनी सुनावले, “नियम आणि निकष माहीत असूनही केवळ राजकीय हेतूने टीका सुरू आहे. मी फिल्डवर जाऊन केलेली कामे रिल्सच्या माध्यमातून जनतेला दाखवते, म्हणून मला रिलस्टार म्हटले जाते. पण मी रिलस्टार आहे की रिअलस्टार, हे मुंबईची जनता ठरवेल. सुषमा अंधारे यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या दिव्याखाली काय अंधार आहे ते पाहावे.”

शेवटी, महापौरांनी २५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब काढण्याचा इशारा दिला. “तुम्हाला महापालिकेची खुर्ची आणि अंगण काहीच राखता आले नाही. चेंबूरमधील निष्पाप बालकाच्या मृत्यूचे दुःख मलाही एका आईसारखेच आहे. जर तुम्ही यावर राजकारण करणार असाल, तर गेल्या २५ वर्षांत झाडे पडून आणि मॅनहोलमध्ये गुदमरून किती निष्पाप मुंबईकरांचे बळी गेले, याचा संपूर्ण हिशोब आम्हालाही जनतेसमोर मांडावा लागेल,” असे खडेबोल त्यांनी विरोधकांना सुनावले.

ताज्या बातम्या

Crime News : १७ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या

0
पुणे | प्रतिनिधी Pune पुणे शहरातील हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे प्रेमप्रकरणातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...